Join us

मराठी कलाकार जमले 'सिंबा'च्या चित्रीकरणासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 15:17 IST

नुकताच अभिनेता सौरभ गोखलेने 'सिंबा'च्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ठळक मुद्दे 'सिंबा' चित्रपट २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा 'सिंबा' गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सारा खानादेखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार मंडळीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आता कोण-कोण कलाकार आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल ना... नुकताच अभिनेता सौरभ गोखलेने सिंबाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात मराठी कलाकार दिसत आहेत. यात सौरभसह सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, नंदू माधव हे कलाकार त्यात दिसत आहेत. 

अभिनेता सौरभ गोखले याने त्याच्या फेसबुक ऑफिशियल पेजवर सेटवरील फोटो शेअर करीत लिहिले की, 'सिंबा'चे चित्रीकरण पुन्हा सुरू. 'सिंबा'मध्ये सौरभ गोखले, सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, नंदू माधव या कलाकारांसह नेहा महाजन व आणखीन मराठी कलाकार दिसणार आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेता सोनू सूददेखील या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने मराठी भाषेचे धडेदेखील गिरविले आहेत. 'सिंबा'मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंबा' हा सिनेमा तेलगू चित्रपट टेंपरचा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग टेंपरमधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल. हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सिंबा'मध्ये आणखीन कोण मराठी कलाकार दिसणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगसिद्धार्थ जाधवसौरभ गोखले