टाईमपास, पावनखिंड, शेर शिवराज, काकस्पर्श अशा अनेक चित्रपटांत झळकलेले, छोट्या पडद्यावरच्या अनेक लोकप्रिय मालिकेत दिसलेले आणि नाटकांतून गाजलेले मराठीतील दिग्गज अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale ) यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. राज्यात नुकताच गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वैभव मांगले यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. वैभव मांगले यांनी आपल्या पोस्टमध्ये गणेशोत्सवाचा थेट उल्लेख केलेला नाही. पण त्यांच्या पोस्टला गणेशोत्सवाचा संदर्भ जोडला जात आहे. एकूणच गणेशोत्सवातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल वैभव मांगले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘टिळकांनी याचसाठी केला होता अट्टाहास...!,’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. या एका ओळीच्या पोस्टखाली कमेंट बॉक्समध्ये त्यांनी आपला संतापही बोलून दाखवला आहे.
‘राजकारण्यांच्या हातात आपल्या धार्मिक, नैतिक, सामाजिक, आर्थिक नाड्या गेल्या आहेत हे आता तरी लोकांच्या लक्षात येईल का? आणि या आपणच दिल्या आहेत,’ असं एका कमेंटमध्ये त्यांनी लिहिलं आहे. ‘मूळ हेतूला बगल देऊन स्वत:चे स्वार्थ साधले जातात आणि एकूणच त्रासदायक परिस्थिती निर्माण करतात, त्या त्या सगळ्यांसाठी आहे हे (पोस्ट)आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते... टिळकांनी याचसाठी केला होता अट्टाहास...’, असं अन्य एका कमेंटमध्ये त्यांनी लिहिलं आहे.