Join us

"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:51 IST

स्वप्निलने जोशीने पहिल्यांदाच एका मुलाखतीत त्याच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं. लग्नानंतर ४ वर्षांतच स्वप्निलचा संसार मोडला होता.

मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता स्वप्नील जोशीकडे पाहिलं जातं. बालपणापासूनच स्वप्निलने अभिनयात करिअर करायला सुरुवात केली होती. स्वप्निलचा सुशीला-सुजीत सिनेमा अलिकडेच सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत स्वप्निलने त्याचं लव्ह लाइफ, लग्न आणि घटस्फोट यांच्याबद्दल भाष्य करताना प्रेमाची व्याख्यादेखील सांगितली. 

स्वप्निलने 'दॅट ऑड इंजिनियर' या युट्यूबला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रेमाबद्दल बोलताना स्वप्निल म्हणाला, "मला नववीत असताना एक मुलगी आवडत होती. पण, तेव्हा मुलगी आवडते म्हणजे काय हे माहितच नव्हतं. त्यानंतर कॉलेजमध्ये एक मुलगी आवडायची. आमचं सिरियस अफेअर होतं. पण ब्रेकअप झालं. त्यानंतरही माझं एक अफेअर होतं. पहिला हार्टब्रेक खूप वाईट असतो. त्यानंतर मग माझं लग्न झालं. पण, लग्नानंतर ४-५ वर्षांनी माझा घटस्फोट झाला. त्यानंतर मग दुसरं लग्न झालं. आता सुदैवाने बायको, दोन मुलं आणि सुखी संसार आहे". 

पुढे स्वप्निलला "घटस्फोट घेताना लोक काय म्हणतील, हा विचार आला का?" असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा सोशल मीडियाबद्दल बोलताना स्वप्निल म्हणाला, "माझा घटस्फोट होत होता तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. तेव्हा प्रिंट आणि टेलिव्हिजन मीडिया होतं. पण, मराठीतील एकाही प्रिंट पत्रकाराने माझ्या घटस्फोटाची बातमी पेपरमध्ये छापलेली नाही. आणि हे मी नेहमी अभिमानाने सांगतो. घटस्फोट हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडिया पोस्ट टाकाव्या लागतात, की आम्हाला प्रायव्हसी द्या. एक जोडपं जेव्हा वेगळं होतं तेव्हा ते खूप यातनेतून जात असतं. ते दोघेही...चूक कोण आणि बरोबर कोण, हे कोणीही ठरवू शकत नाही. फक्त द्या दोघांना माहीत असतं की काय घडलंय. तिसऱ्या माणसाला खरंच माहीत नसतं की खरं काय घडलंय...किंवा का वेगळे होत्यात. ती त्यांची लढाई लढत असतात. त्यात आपण त्यांचा त्रास कमी करत नसलो तर निदान वाढवूया तरी नको". 

स्वप्नील जोशीने २००५ साली अपर्णा जोशी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर ४ वर्षांनी २००९मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. पहिल्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी स्वप्निलने पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. २०११ साली त्याने डेंटिस्ट असलेल्या लीना आराध्येसोबत नव्याने आयुष्याला सुरुवात केली. आता त्यांना दोन मुले आहेत. 

टॅग्स :स्वप्निल जोशीमराठी अभिनेता