Suvrat Joshi: विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन जवळपास महिना उलटला आहे. तरीही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे. मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारमंडळी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटात बरेच मराठमोळे चेहरे देखील झळकले आहेत. अशातच 'छावा' सिनेमात कान्होजीची भूमिका साकारणारा अभिनेता सुव्रत जोशीने साकारली आहे. फंदफितुरी करुन गणोजी- कान्होजी छत्रपती शंभूराजेंना कैद करण्यासाठी औरंगजेबाला साहाय्य करतात अशी कहाणी सिनेमात पाहायला मिळते. त्याच्या या भूमिकेविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने भाष्य केलं आहे.
'लोकशाही फ्रेंडली'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुव्रत जोशीने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. या मुलाखतीमध्ये सुव्रत जोशी म्हणाला, "प्रेक्षकांना या पात्राची चीड येणं अभिप्रेत असेल तर ते माझं काम आहे. पण, म्हणजे काय कलाकाराने पूर्णच त्याची बुद्धी गहाण ठेवायची का? नैतिकता बाजूला ठेवायची का? तर तसं अजिबात नाही. मी कुठलंही प्रोजेक्ट स्विकारताना दोन गोष्टी विचार करतो. की ती पूर्ण गोष्ट किंवा ते प्रोजेक्ट काय सांगतंय."
पुढे अभिनेत्याने म्हटलं. "छावा'च्या बाबतीत छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य आहे ते संपूर्ण जगापर्यंत पोहोचावं या अत्यंत सद्हेतूने तयार केलेला हा चित्रपट आहे. ती गोष्ट लहान मुलांपासून जगभरात जिथे-जिथे जो कोणी माणूस असेल त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं, या हेतून चित्रपट तयार केला गेला होता. त्या हेतूशी मी समरस होतो म्हणून मी चित्रपटासाठी होकार दिला."