Join us

डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ अन्...; भजनात दंग झाला अमेय वाघ, म्हणतो- शहरातल्या मित्रांबरोबर चंगळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:14 IST

अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमेय वाघ भजन करत असल्याचं दिसत आहे.

अमेय वाघ हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या अमेयला 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत कैवल्य ही भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला. विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा अमेय सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींची माहिती तो चाहत्यांना देत असतो. 

नुकतंच अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमेय वाघ भजन करत असल्याचं दिसत आहे. पारंपरिक पोशाखात आणि डोक्यावर टोपी घालून तो भजनी मंडळींसोबत भजन करण्यात दंग झाला आहे. हातातील टाळ वाजवत अमेय "ए भोळ्या शंकरा" हे भजन गात आहे. हा व्हिडिओ शेअर करत अमेयने "पूरे झाली शहरातल्या मित्रांबरोबर चंगळ…मला सामावून घेतंय गावातलं भजनी मंडळ" असं म्हटलं आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी करत कौतुक केलं आहे. 

अमेय वाघने अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'फास्टर फेणे' या सिनेमातील त्याची भूमिका विशेष गाजली. याव्यतिरिक्त त्याने 'मुरांबा', 'झोंबिवली', 'मी वसंतराव', 'गर्लफ्रेंड', 'धुरळा', 'कारखानिसांची वारी' अशा सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'असूर' या वेब सीरिजमधील अमेयची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

टॅग्स :अमेय वाघमराठी अभिनेता