Join us

अभिनयाची आवड असलेल्यांना महेश मांजरेकर देणार संधी, अशाप्रकारे द्या ऑडिशन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 15:25 IST

महेश मांजरेकर यांनी फेसबुकला नुकतीच पोस्ट लिहून याबद्दल सांगितले आहे.

ठळक मुद्देमहेश मांजरेकर यांनी फेसबुकला पोस्ट लिहिली असून त्यात म्हटले आहे की, मी Online Audition चं आवाहन करतोय. तुम्ही कोणत्याही वयातले असाल, तुम्हाला अभिनयाची आवड असेल तर तुम्हाला आवडतील ते डायलॉग्ज, आवडेल तो परफॉर्मन्स आम्हाला मोबाईलवर शूट करून पाठवा.

आपल्याला देखील एखाद्या चित्रपटात अथवा मालिकेत काम करायला मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. काही वेळा तर अभिनयाचे गुण अंगात असूनदेखील कशाप्रकारे काम मिळवायचे हेच अनेकांना कळत नाही. अभिनयक्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना आाता एक सुवर्णसंधी मिळणार आहे. महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करायला मिळणार असून त्यांनीच सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. 

महेश मांजरेकर यांनी फेसबुकला नुकतीच पोस्ट लिहिली असून त्यात म्हटले आहे की, नमस्कार, मी महेश मांजरेकर... सध्या कोरोनामुळे शूटिंग्ज बंद आहेत. नाटकांचे प्रयोग थांबलेले आहेत. मीसुद्धा घरी बसूनच पुढील सिनेमाचं लिखाण करतोय. एकूण सगळीकडेच वर्क फ्राॅम होम सुरू आहे. काही मित्रांशी बोलत असताना असं लक्षात आलं की, घरी बसून करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. कदाचित तुम्हालाही पडला असेल. म्हणून मग एक विचार आला तुम्हाला एक ॲक्टिव्हीटी द्यावी. 

बऱ्याच काळापासून मी ऐकतोय की माझ्या किंवा माझ्या कंपनीच्या नावाने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ऑडिशन्स सुरू असतात. त्यावर काहीतरी इलाज करायचा असं बरेच दिवस डोक्यात होतं. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की, मी कधीही अशा ऑडिशन्स घेत नाही. पण आता पहिल्यांदा मी Online Audition चं आवाहन करतोय. तुम्ही कोणत्याही वयातले असाल, तुम्हाला अभिनयाची आवड असेल, तुमचं अभिनयाचं शिक्षण झालं असेल तर तुम्हाला आवडतील ते डायलाॅग्ज, आवडेल तो परफाॅर्मन्स आम्हाला मोबाईलवर शूट करून पाठवा, सोबत तुमची माहिती, तुमचे फोटो, संपर्क क्रमांकही पाठवा. यासाठी ई-मेल आयडी आहे - talentbank2020@gmail.com माझी टीम (जी सध्या घरीच बसलेली आहे) ते या माहितीचं संकलन करतील. तुमचं नाव आमच्याकडे रजिस्टर केलं जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. 

टॅग्स :महेश मांजरेकर