Join us

"हळूहळू शिवाजी पार्कवरही..." मराठी माणसांची संख्या घटली, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 11:13 IST

मुंबईत मराठी माणसांच्या घटत्या लोकसंख्येवर महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

मुंबई... स्वप्नांची नगरी! एक काळ असा होता, जेव्हा मध्य मुंबईचा प्रत्येक भाग दादर, गिरगाव, लालबाग आणि शिवाजी पार्कच्या चाळींमध्ये मराठी कुटुंबांचा वावर होता. पण, आज परिस्थिती वेगळी आहे. मुंबईतील वाढत्या महागाईमुळे आणि गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींमुळे मराठी मध्यमवर्गीय कुटुंबे उपनगरांमध्ये, किंवा ठाणे, डोंबिवली आणि अगदी पुण्यासारख्या शहरांमध्ये स्थायिक झाली आहेत. त्यांच्या जागी परराज्यातून आलेल्यांची संख्या वाढली आहे. याच बदलावर नुकतंच प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी चिंता व्यक्त केली.

महेश मांजरेकर यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.  या कार्यक्रमात महेश मांजरेकरांना "कमल शेडगे ज्येष्ठ रंगकर्मी" पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी ते म्हणाले, "मुंबईमध्ये मराठीपण उरलं नाहीये. आता तर आपल्या शिवाजी पार्कवरही हळूहळू मराठी कमी होत नाही.  जे थोडंफार टिकलं आहे, ते पुणे आणि मुलुंडमध्ये आहे. त्याचा आनंद आहे", असं त्यांनी म्हटलं. 

आपल्या परखड मतांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांचा मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेसाठीचा आग्रह सर्वश्रुत आहे. त्यांच्या मुलाखतींमधून आणि कलाकृतींमधून त्यांनी अनेकदा हा मुद्दा ठामपणे मांडला आहे. त्यांचा 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…' हा चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांची सिनेमातील भूमिका असो किंवा सार्वजनिक मंचावरील भाषण, मराठीसाठीचा त्यांचा आग्रह कायम राहिला आहे.

शिवाजी पार्कचं महत्त्व:

शिवाजी पार्क हे मुंबईतील दादर (पश्चिम) या भागात आहे. शिवाजी पार्क हे केवळ एक मैदान नाही, तर मराठी राजकारण आणि संस्कृतीचे ते एक प्रतीक आहे. बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय सभा प्रामुख्याने इथेच होत असत. शिवसेना आणि मनसेसारख्या पक्षांसाठी हे ठिकाण एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते.

टॅग्स :महेश मांजरेकर मराठीमुंबई