Join us

​महालक्ष्मी अय्यर गाणार मराठी चित्रपटासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 16:21 IST

महालक्ष्मी अय्यरने गेल्या अनेक वर्षांत एकाहून एक सरस गाणी गायली आहेत. दस, दिल से, झंकार बीट्स यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये ...

महालक्ष्मी अय्यरने गेल्या अनेक वर्षांत एकाहून एक सरस गाणी गायली आहेत. दस, दिल से, झंकार बीट्स यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तिने गायलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहेत. तसेच कमस, कहता है दिल, अस्तित्व एक प्रेम कहाणी, थोडी खुशी थोडी गम यांसारख्या मालिकांची तिने गायलेली शीर्षकगीते तर प्रचंड गाजली होती. तिने आतापर्यंत हिंदी सोबतच तामिळ, तेलगू, बंगाली, आसामी, कन्नड, मराठी अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सगळ्याच भाषेतील तिच्या गाण्यांना रसिकांनी पसंती दिली आहे.शर्यत, टाईमपास, टाईमपास 2, काय राव तुम्ही यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी गायलेली गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. आता ती आणखी एका मराठी चित्रपटासाठी गाणार असून तिने हे गाणे नुकतेच रेकॉर्ड केले आहे.महालक्ष्मी तिच्या या नव्या गाण्याबाबत खूप उत्सुक आहे. तिनेच तिच्या या नव्या गाण्याबाबत सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना सांगितले आहे. महालक्ष्मीने नवीन गाण्याचे रेकॉर्डिंग असे म्हणत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत संगीतकार चिनार-महेश, गीतकार मंगेश कांगणे आपल्याला दिसत आहेत. यासोबतच तिने रेट्रो स्टाइल एक खूप चांगले गाणे मी नुकतेच रेकॉर्ड केले असल्याचे म्हटले आहे. हे गाणे मंगेश कांगणेने लिहिले असून चिनार-महेश या जोडीने या गाण्याला संगीत दिले आहे. माझे हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एका मराठी चित्रपटासाठी मी गाणे गायले आहे.टाइमपास आणि टाइमपास 2 या चित्रपटासाठी महालक्ष्मीने याआधी चिनार-महेशसोबत काम केले आहे. महालक्ष्मीने कोणत्या चित्रपटासाठी गायले हे लवकरच ती तिच्या फॅन्सना सांगणार आहे.