Join us

​मधुरा वेलणकर आणि प्रदीप वेलणकर आठ वर्षांनंतर करणार एकत्र काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 16:26 IST

मधुरा वेलणकर तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून अभिनयक्षेत्रात आली. तिचे वडील प्रदीप वेलणकर हे मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव ...

मधुरा वेलणकर तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून अभिनयक्षेत्रात आली. तिचे वडील प्रदीप वेलणकर हे मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनय क्षेत्र म्हटले की, तुम्हाला चित्रीकरणासाठी अनेक तास द्यावे लागतात. प्रदीप वेलणकर यांचे शेड्युल तर नेहमीच व्यग्र असायचे आणि हे सगळे मधुराने लहानपणापासून पाहिले आहे. पण तरीही तिला अभिनयाची आवड असल्याने ती अभिनयक्षेत्राकडे वळली. तिचे आणि तिच्या वडिलांचे ट्युनिंग खूपच चांगले आहे. ती नेहमीच तिच्या वडिलांसोबत विविध विषयांवर गप्पा मारत असते. त्या दोघांनाही शास्त्रीय संगीत, खेळ याची खूप आवड आहे. त्यामुळे त्या दोघांच्या यावर नेहमीच गप्पा रंगतात. तसेच तिच्या वडिलांना मांसाहारी पदार्थ आवडत असल्याने ती त्यांच्यासाठी नेहमीच विविध पदार्थ बनवत असते. मधुरा आणि प्रदीप यांनी गिल्टी, मी अमृता बोलतेय, रंगीबेरंगी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मधुरा आणि प्रदीप वेलणकर 2008 नंतर कोणत्याही मालिकेत अथवा चित्रपटात एकत्र झळकले नव्हते. पण आता ते एका चित्रपटात काम करणार आहेत आणि सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण जोरात सुरू आहे.प्रदीप वेलणकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ही माहिती त्यांच्या फॅन्सना दिली आहे. त्यांनी मधुरासोबत एक फोटो शेअर केला असून मी आणि मधुरा जवळजवळ आठ वर्षांनंतर एकत्र काम करत आहोत असे म्हटले आहे. तसेच ते एका मराठी चित्रपटात झळकणार असून त्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या पुण्यात सुरू असल्याचे देखील त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या फॅन्सना सांगितले आहे.