Join us

माधव परत येतोय..! 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा १५ जूनला शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 20:11 IST

Gela Madhav Kunikade : ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या 'गेला माधव कुणीकडे' या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले.

‘अरे हाय काय अन् नाय काय' असं म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव आठवतोय का? रसिकांना हास्याची मेजवानी देणारा माधव मध्यंतरी रंगभूमीवर दिसेनासा झाला. त्यानंतर 'गेला माधव कुणीकडे' (Gela Madhav Kunikade) असं विचारणाऱ्या नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माधव धुमाकूळ घालायला परत येतो आहे.

 'अरे हाय काय अन् नाय काय' असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडी सज्ज झाली आहे. या जोडीच्या 'गेला माधव कुणीकडे' या  खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झाले. या नाटकातील प्रशांत दामले यांचा 'अरे हाय काय अन् नाय काय'  हा  डायलाॅग आजही चांगलाच पाॅप्युलर आहे. सलग एक तपाहून अधिक काळ या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली. 

आजवर झालेत १८०२ प्रयोग

७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने 'ब्रेक' घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा शुभारंभ १५ जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी ४ वाजता होणार आहे.  तिकीट विक्रीचा शुभारंभ १ जून रोजी फक्त ‘तिकीटलाय’अॅप वर सुरु  होईल.

नाटकात झळकणार हे कलाकार

वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाची संहिताच धमाकेदार होती. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि  कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.     

टॅग्स :प्रशांत दामले