स्वप्निल पाहतोय फुगेच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 11:00 IST
दोन मित्रांमध्ये असलेले प्रेम, जिव्हाळा यावर भाष्य करणारा फुगे हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. व्हेलेन्टाईन डेचे निमित्त ...
स्वप्निल पाहतोय फुगेच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट
दोन मित्रांमध्ये असलेले प्रेम, जिव्हाळा यावर भाष्य करणारा फुगे हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. व्हेलेन्टाईन डेचे निमित्त साधून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे यांच्या फक्कड मैत्रीवर आधारित असलेल्या या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटात स्वप्निल आणि सुबोधसोबतच प्रार्थना बेहेरे आणि नीता शेट्टी यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. फुगे या चित्रपटातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच भुरळ घालत आहे. काही कळे तुला... हे गाणे काहीच दिवसांपूर्वी सोशल नेटवर्किंगला प्रदर्शित झाले. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या गाण्यावर निर्मात्यांनी 20 लाखांहूनही अधिक खर्च केला आहे. यामुळे यावर्षीच्या सर्वात महागड्या गाण्यांच्या यादीत या गाण्याचा समावेश झाला आहे. फुगे हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आता काहीच दिवसच राहिलेले आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे सध्या प्रमोशनदेखील जोरदार सुरू आहे. स्वप्निल जोशी सध्या त्याच्या भिकारी या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तरीही तो वेळात वेळ काढून त्याच्या फेसबुकच्या अकाऊंटवर या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेचे धमालमस्तीचे विविध फोटो पोस्ट करत आहे. त्याने नुकताच फुगे या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा फोटो पोस्ट करून चित्रपटाच्या चित्रीकरणाला केवळ 23 दिवस उरले आहेत असे म्हटले आहे. स्वप्निलदेखील त्याच्या फॅन्सप्रमाणे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे असेच यावरून म्हणावे लागेल.फुगे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे यांनी केले असून या चित्रपटातील सुबोध, स्वप्निलच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा नक्कीच चांगलाच प्रतिसाद मिळेल अशी सगळ्यांना खात्री आहे.