Join us

ध्यानीमनी चित्रपटाच्या टीमने केला लोकल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 11:19 IST

चंद्रकांत कुलकणी दिग्दर्शित ध्यानीमनी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू असल्याचे पाहायला ...

चंद्रकांत कुलकणी दिग्दर्शित ध्यानीमनी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या ध्यानीमनी या चित्रपटाच्या टीमने प्रमोशन फंडा म्हणून नुकताच लोकलने प्रवास केला आहे. हा प्रवास त्यांनी चर्चेगेट ते पार्ले असा केला. या प्रवासात महेश मांजरेकर, आश्विनी भावे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी हे कलाकार पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर या टीमने रेल्वे स्थानकावर पोहचताच पानीपुरीचादेखील आस्वाद घेतला आहे. या प्रवासाचे काही फोटो नुकतेच सोशलमीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंना सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहेत.                    महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्या ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट यांची  निर्मिती असलेला ध्यानीमनी हा चित्रपट आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर आणि आश्विनी भावे ही हटके जोडी पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकदेखील हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटात प्रेक्षकांचे लाडके कलाकार अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे झळकणार आहेत.                         स्मिता ठाकरे, अमोलख सिंग गाखल, इक्बालसिंग गाखल आणि राजेश बंगा हे या चित्रपटाचे सहनिमार्ते आहेत. आशयसंपन्न नाटकं आणि अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं अत्यंत कल्पक असं दिग्दर्शन केलं आहे. प्रशांत दळवी यांनी चित्रपटाचे कथा पटकथा आणि संवाद लिहिले असून संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना १० फ्रेबुवारीला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.