LMOTY 2026: मराठी चित्रपटसृष्टीचे सम्राट आणि रसिक प्रेक्षकांचे लाडके 'अशोक मामा' म्हणजेच अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनंतर आता यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - जीवनगौरव' पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले. या खास क्षणी अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ उपस्थित होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सोहळा मंगळवार, दि. १० मार्च रोजी भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या 'गेटवे ऑफ इंडिया' येथे पार पडतोय. या दिमाखदार सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. या खास क्षणी प्रसिद्ध गायक शान यानं अशोक सराफ यांच्यासाठी 'अश्विनी ये ना' हे गाणं गायलं.
पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ आनंद व्यक्त करत म्हणाले की, "दोन शब्द बोलले मी फक्त... धन्यवाद, आता पुन्हा मला आणखी एक जीवनगौरव पुरस्कार मिळतोय. हा नुसता पुरस्कार नाही तर हा माझी काम करण्यासाठी हिमंत वाढवणारा पुरस्कार आहे".
पुढे ते म्हणाले, "हा पुरस्कार मिळवण्यासाठी मी एकटा जबाबदार नाही तर माझे प्रेक्षक, माझ्या बरोबरचे सहकलाकार आणि माझ्याबद्दल कायम सदिच्छा बाळगणारे लोक हे सतत माझ्या पाठीशी असल्यानं हे काम झालं. मी केलं असं कधीही म्हणार नाही. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. लोकमत या वर्तमानपत्राचा मी मोठा आभारी आहे. त्यांनी मला या पुरस्कारासाठी पात्र समजलं. दर्डा यांचा मी कायम ऋणी राहिल. माझ्याबरोबर व्यासपीठावर जे उभे आहेत. ते बऱ्याचवेळा मला पुरस्कार देताना उभे होते आणि आजही ते पुन्हा उभे आहेत, ही सर्वांत मोठी गोष्ट आहे".
याच कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन केले. ते म्हणाले, "अशोक सराफ यांना आतापर्यंत बरेच मोठे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पुरस्कार ठेवण्यासाठी एक शोकेस द्यायला हवं. अशोक यांनी चित्रपट आणि नाटकांमधून जो आनंद आपल्याला दिला आहे, तर त्याची परतफेड कितीही पुरस्कार दिले तरी करता येणार नाही. त्यामुळे या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन करताना त्यांना आणखी पुरस्कार मिळत राहो, अशा शुभेच्छा मी देतो".
अशोक सराफ यांचा प्रेरणादायी प्रवास
अशोक सराफ यांना सर्वजण प्रेमाने 'मामा'अशी हाक मारतात. अशोक सराफ यांचा जन्म १९४७ साली मुंबईतच झाला. १९६९ पासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. 'जानकी' या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी 'आयत्या घरात घरोबा', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'भूताचा भाऊ', 'धुमधडाका'सह ३०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे.
विनोदी अभिनेता म्हणून ते लोकप्रिय झाले. सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूप गाजले. सिनेमांशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली. हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका गाजवला. 'सिंघम' मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. याशिवाय 'गुप्त', 'कोयला', 'येस बॉस', 'करण अर्जुन', 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
Web Summary : Veteran actor Ashok Saraf received the 'Lokmat Maharashtrian of the Year - Lifetime Achievement' award. He dedicated the award to his audience and co-stars, acknowledging their support. Chief Minister Fadnavis and Deputy Chief Minister Shinde presented the award at a grand ceremony at Gateway of India.
Web Summary : दिग्गज अभिनेता अशोक सराफ को 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर - लाइफटाइम अचीवमेंट' पुरस्कार मिला। उन्होंने दर्शकों और सह-कलाकारों को समर्थन के लिए धन्यवाद दिया। मुख्यमंत्री फडणवीस और उपमुख्यमंत्री शिंदे ने गेटवे ऑफ इंडिया में एक भव्य समारोह में पुरस्कार प्रदान किया।