Join us

​जाणून घ्या अमृता खानविलकरचा अभिनयप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 11:33 IST

अमृता खानविलकरच्या काही फॅन्सने तिच्या अभिनयप्रवासाचा एक छानसा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अमृताच्या बालपणापासून ते आतापर्यंतचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत.

अमृता खानविलकरने आज मराठी चित्रपटसृष्टीत तिचे खास स्थान निर्माण केले आहे. नटरंग या चित्रपटातील वाजले की बारा या लावणीवर तिने सादर केलेल्या नृत्यावर आजही अनेकजण फिदा आहेत. तिने सतरंगी रे, बाजी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बसस्टॉप हा तिचा चित्रपट काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातही ती एका हटके भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.मराठी चित्रपटांप्रमाणेच तिने फूंक 2, फूंक यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 24च्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. नच बलिये या कार्यक्रमातदेखील तिने तिचे पती हिमांशू मल्होत्रासोबत भाग घेतला होता. या कार्यक्रमात या दोघांनी एकाहून एक सरस नृत्य सादर केले आणि त्यांनी या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवले. अमृताचे आज असंख्य चाहते आहेत. अमृताच्या काही चाहत्यांनी तिच्या प्रवासाचा एक छानसा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे.अमृताच्या चाहत्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत अमृताच्या बालपणीपासून ते आतापर्यंतचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिने आजवर मिळवलेले यश या व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अमृताच्या फॅन्सने प्रयत्न केला आहे.अमृताच्या या व्हिडिओला आतापर्यंत 16 हजारांहूनही अधिक लाइक्स मिळाले असून अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहे. तुम्हालादेखील अमृताचा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल यात काहीच शंका नाही. अमृता आजच नाही तर तिच्या बालपणापासूनच अतिशय सुंदर असल्याचे आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ आवर्जून पाहा.