Join us

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचं सिनेसृष्टीत पदार्पण, स्वानंदी -सुमेध 'मन येड्यागत झालं' चित्रपटातून होणार रोमँटिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 15:11 IST

लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डे एका नव्याकोऱ्या रोमँटिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुपरस्टार दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात. लक्ष्मीकांत बेर्डेंची पुढची पिढी सुद्धा म्हणजेच त्यांची मुलं अभिनय,  स्वानंदी (Swanandi Berde) सुद्धा मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. अभिनय आता लोकप्रिय अभिनेता झालाय हे सर्वांना माहितच आहे. अशातच लक्ष्मीकांत यांची लेक स्वानंदी सुद्धा आता सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. 'मन येड्यागत झालं' या सिनेमातून स्वानंदी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय.

याआधी स्वानंदीने नाटक, एकांकिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर स्वानंदीच्या जोडीला या चित्रपटात संपूर्ण भारतात भगवान श्रीकृष्ण यांचे रुप साकारत दर्शन देणारा अभिनेता सुमेध मुदगलकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सुमेधने याआधी बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आता स्वानंदी व सुमेध यांची फ्रेश जोडी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे. तर अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

'श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन' अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी व कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे.  तर कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आणि निर्मिती प्रमुख पूनम घोरपडे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटाच्या लिखाणाची जबाबदारी विकास जोशी, सुदर्शन पांचाळ यांनी सांभाळली आहे. तसेच संपूर्ण चित्रपट मयुरेश जोशी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीसह चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

'मन येड्यागत झालं' या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या दिलाचा ठेका नक्कीच चुकवतील यांत शंका नाही. चित्रपटाच्या संगीताची धुरा निलेश पतंगे याने उत्तमरीत्या पेलवली आहे, तर गाणी सुदर्शन पांचाळ, सिद्धेश पतंगे लिखित आहेत. या चित्रपटाच्या गाण्यांना जावेद अली, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी, निलेश पतंगे यांनी त्यांचा सुमधुर व दमदार आवाज दिला आहे. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीचा नव्या प्रेमाचा रंग 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून येत्या १ मार्चपासून मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.

टॅग्स :स्वानंदी बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डेसुमेध मुदगलकर