Join us

​६ गुण या चित्रपटाचे म्युझिक आणि ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 11:23 IST

शालेय मुलांवरील अभ्यासाचे दडपण आणि मुलांना समजून घेण्याची गरज हा विषय मांडत शिक्षण पद्धतीवर ६ गुण या चित्रपटातून भाष्य ...

शालेय मुलांवरील अभ्यासाचे दडपण आणि मुलांना समजून घेण्याची गरज हा विषय मांडत शिक्षण पद्धतीवर ६ गुण या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या टीमच्या उपस्थितीत म्युझिक आणि ट्रेलर लाँच नुकताच करण्यात आला. हा चित्रपट विविध महोत्सवांमध्ये गाजलेला असून १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.विद्या सर्वदे हा गावातील शाळेत पहिला येणारा मुलगा. त्याचे वडील परदेशात शास्त्रज्ञ आहेत. आईच्या कडक शिस्तीत वाढलेला हा विद्या खूप हुशार आहे. मात्र, जगातील स्पर्धेविषयी अनभिज्ञ आहे. नवीन आलेला हरहुन्नरी राजू त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवून शाळेत पहिला येतो. विद्या राजूची बरोबरी करू शकत नाही. त्यानंतर विद्याला अभ्यासात करावी लागणारी स्पर्धा, त्याच्या पालकांना येणारे दडपण, विद्याची मनोवस्था या सगळ्याचे चित्रण गुण या चित्रपटात करण्यात आले आहे. चित्रपटाद्वारे किरण गावडे यांनी दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली आहे. उज्ज्वला गावडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अशोक कोटियन आणि शीला राव या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. शीला राव यांनी याआधी बहुचर्चित "अस्तु" या चित्रपटाची निर्मिती केली होती.'६ गुण' या चित्रपटात सुनील बर्वे, अमृता सुभाष, आर्चित देवधर, अतुल तोडणकर, आरती सोळंकी, प्रणव रावराणे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. चित्रपटात एकूण चार गाणी असून यातील एक गाणे सुरेश वाडकर यांनी गायले आहे. या चित्रपटातून शिक्षण व्यवस्थेवर हसतखेळत भाष्य करण्यात आले आहे. सर्व पालकांनी हा चित्रपट नक्कीच पहावा. त्यातून त्यांना मुलांच्या जाणिवा आणि अभ्यासाचे दडपण आल्यावर त्यांच्या होणाऱ्या मनोवस्थेची कल्पना येईल, असे दिग्दर्शक किरण गावडे सांगतात.