Join us

"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:30 IST

ललित प्रभाकर 'जुळून येती रेशिमगाठी' मालिकेमुळे घराघरात पोहोचला. तो मूळचा उल्हासनगरचा आहे. ललितने नुकतंच एका पॉडकास्टमध्ये त्याच्या आईबाबांचा संघर्षकाळ सांगितला आहे.

अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar)  सध्या 'आरपार' सिनेमामुळे चर्चेत आहे. तो या सिनेमाचा सहनिर्माताही आहे. पहिल्यांदाच त्याने सिनेमा को प्रोड्युस केला आहे. तसंच सिनेमात हृता दुर्गुळे आहे. पहिल्यांदाच ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीने लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान ललित प्रभाकर 'जुळून येती रेशिमगाठी' मालिकेमुळे घराघरात पोहोचला. तो मूळचा उल्हासनगरचा आहे. ललितने नुकतंच एका पॉडकास्टमध्ये त्याच्या आईबाबांचा संघर्षकाळ सांगितला आहे.

ललित प्रभाकरला आयुष्यात कोणकोणत्या माणसांनी प्रभावित केलं आहे यावर त्याने भाष्य केलं. 'मिरची मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला,"मी दर दोन वर्षांनी शाळा बदलल्या. माणसं बदलत राहिली, वेगवेगळ्या लोकांबरोबर ओळखी झाल्या. त्यामुळे मी कुठेच सेटल झालो नाही. पण जास्त माणसं, त्यांचे स्वभाव बघायला मिळाले. यामुळे अनुभवाची कमतरता जाणवली नाही. मी चांगले वाईट, भयानक ते थ्रिल असे अनेक प्रकारचे अनुभव घेतले आहेत. याला कारणीभूत आहे ते म्हणजे माझं आजूबाजूचं वातावरण आणि माणसं. त्यांच्यामुळेच मी मोठा होत होतो."

तो पुढे म्हणाला, "माझ्या आईबाबांचं नाव मी आधी घेईन. दोघंही खरं तर शेतकरी आहेत. बाबांच्या लहानपणीच माझे आजोबा वारले होते. अशा परिस्थितीत बाबांनी स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं. ते गावावरुन मुंबईला आले. लग्नानंतर आईला शिकवलं. एक काळ असा होता जेव्हा राहायला घर नव्हतं. ते स्टेशनवर झोपायचे. या सगळ्या परिस्थितीत त्यांनी स्वत:चं विश्व निर्माण केलं. स्वत:चा प्रोग्रेस केला जो मी खूप जवळून बघितला. उल्हासनगरला आमचं घर हे वन रुम किचन होतं. तिथेच मोरी, बाथरुम सगळं एकामध्येच होतं. तिथपासून ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास मी बघितला आहे. मला वाटतं मी त्याच्या १० टक्केही संघर्ष केलेला नाही किंवा तशी अचिव्हमेंटही मिळवलेली नाही. त्यांचा प्रवास खरंतर अशक्य आहे. त्यांनी असं उदाहरण माझ्यासमोर ठेवलंय ज्याच्या पलीकडे मी जाऊच शकत नाही. त्यांनी एकमेकांना साथ देत स्वत:ला घडवलं. उल्हासनगर नंतर बदलापूरला एका चाळीत आलो. त्या चाळीतून मोठ्या चाळीत गेलो. तिथून परत इमारतीत आलो. वन बीएचके पासून टू बीएचके, मग थ्री बीएचके आता स्वत:चं घर केलं. इतकंच नाही तर गावातून येणाऱ्या लोकांनाही त्यांनी नोकरीसाठी मदत केली. त्यामुळे त्यांनी जे केलंय त्याच्या १० टक्केही मी कमवू शकलो तरी खूप आहे."

टॅग्स :ललित प्रभाकरमराठी अभिनेता