Join us

‘एक निर्णय’ चित्रपटातून कुंजीका रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 15:02 IST

श्रीरंग देशमुख दिग्दर्शित आणि स्वरंग प्रोडक्शन प्रस्तुत ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून कुंजीका मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतल्या मातब्बर कलाकारांसोबत काम करण्याचं प्रत्येक नवोदित कलाकाराचं स्वप्न असतं.  काहींच ते पूर्ण होतं तर काहींचं अधूर राहतं. यापैकीच एक नाव म्हणजे कुंजीका काळवींट. श्रीरंग देशमुख दिग्दर्शित आणि स्वरंग प्रोडक्शन प्रस्तुत ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून कुंजीका मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती ‘मानसी’ या मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुबोध भावे हे  नायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सोबत मधुरा वेलणकर, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, मंगल केंकरे, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मुग्धा गोडबोले, यांसारखे नामवंत कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. १८ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘प्रत्येक नवोदित कलाकाराने एकदातरी अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करायला हवे. त्यामुळे अभिनयातल्या समृद्धतेसोबतच आपल्या अनुभवातही भर पडते.’ अशा भावना कुंजीकाने व्यक्त केल्या तर ‘कुंजीका सारख्या गुणी कलाकारांना या चित्रपटाच्या निमित्ताने उत्तम संधी मिळाली आणि तिने या संधीचं सोनं केलं आहे हे चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या लक्षात येईलच’ अशा भावना दिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांनी व्यक्त केल्या.

या चित्रपटाची सहनिर्मिती जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख यांनी केली आहे. चित्रपटातली गीतं वैभव जोशी यांनी लिहिली असून, कमलेश भडकमकर यांनी ती स्वरात बांधली आहेत. छायांकन अर्चना बोऱ्हाडें यांचे असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी एकनाथ कदम यांनी सांभाळली आहे. संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक यांचे असून ध्वनी आरेखन विजय भोपे यांनी केले आहे. वेशभूषा गीता गोडबोले तर रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. निहिरा जोशी देशपांडे, ऋषिकेश कामेरकर, जयदीप वैद्य, श्रुती आठवले, अंजली मराठे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. १८ जानेवारीला ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.