किरण करमरकर यांना पुन्हा एकदा करायचे आहे नाटकात काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2017 15:37 IST
किरण करमरकर हे नाव कहानी घर घर की या मालिकेमुळे नावारूपाला आले. या मालिकेत त्यांनी साकारलेली ओम ही भूमिका ...
किरण करमरकर यांना पुन्हा एकदा करायचे आहे नाटकात काम
किरण करमरकर हे नाव कहानी घर घर की या मालिकेमुळे नावारूपाला आले. या मालिकेत त्यांनी साकारलेली ओम ही भूमिका प्रचंड गाजली होती. याआधी कहानी घर घर की, इतिहास यांसारख्या मालिकांमध्ये ते झळकले होते. सध्या किरण ढाई किलो प्रेम या मालिकेत काम करत आहेत. किरण आज हिंदी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत असले तरी त्यांनी त्याच्या कारकिर्दीची सुरुवात मराठी इंडस्ट्रीमधून केली आहे. मराठीत त्यांनी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. दिनमान या मराठी मालिकेद्वारे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर किरण यांनी षड्यंत्र या नाटकात काम केले होते. या नाटकात त्यांनी एका कलाकाराला रिप्लेस केले होते. तसेच या नाटकातील त्यांची भूमिका ही खूपच छोटी होती. या नाटकांनंतर किरणने किमयागार, सुंदर मी होणार या नाटकात दर्जेदार भूमिका साकारल्या. ही दोन्ही नाटके चांगलीच गाजली होती. पण 1995 नंतर ते मराठी रंगभूमीकडे वळले नाहीत. त्यांनी दरम्यानच्या काळात 5-6 हिंदी नाटकांमध्ये काम केले होते. पण त्यांनी पुन्हा एकदा मराठी नाटकांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याविषयी ते सांगतात, "मराठी नाटकांमध्ये काम करण्याची मी कित्येक दिवसांपासून वाट पाहात आहे. पण नाटक करायचे म्हणजे तालमींनादेखील तेवढाच वेळ द्यावा लागतो. हिंदी मालिकांमध्ये व्यग्र असल्याने तितका वेळ देणे माझ्यासाठी अशक्य होते. त्यामुळे मी नाटकांपासून दूर होतो. पण आता मराठी नाटकांमध्ये काम करायचे मी ठरवले आहे. पुढील काळात लवकरच मी नाटकामध्ये झळकेल."