केतकी माटेगावकरला अतिउत्साही चाहत्यांनी घेरले; वडिलांची पोलीस महासंचालकाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 22:01 IST
‘टाइमपास’ फेम अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिला एका जाहीर कार्यक्रमात चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. अपुºया सुरक्षा व्यवस्थेमुळे ...
केतकी माटेगावकरला अतिउत्साही चाहत्यांनी घेरले; वडिलांची पोलीस महासंचालकाकडे तक्रार
‘टाइमपास’ फेम अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिला एका जाहीर कार्यक्रमात चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. अपुºया सुरक्षा व्यवस्थेमुळे तिला चाहत्यांनी असा काही गराडा घातला की, त्यामधून बाहेर पडणे तिला अशक्य झाले होते. केतकीसोबत घडलेल्या या प्रसंगामुळे तिच्या वडिलांनी थेट पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना पत्र लिहून झालेल्या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. केतकीचे वडील पराग माटेगावकर यांनी लिहिलेल्या पत्रानुसार, गेल्या शनिवारी जळगावमध्ये बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी केतकीला आमंत्रित करण्यात आले होते. केतकीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी कार्यक्रमस्थळी एकच गर्दी केली होती. जेव्हा ती कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरली तेव्हा मात्र चाहत्यांचा संयम तुटला. त्यांनी तिला अक्षरश: गराडा घालत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या केतकीला या गराड्याबाहेर पडणे मुश्किल झाले होते. अखेर स्थानिक महिलांनी कडे करून तिची चाहत्यांमधून सुटका केली. कशीबशी केतकी तिच्या गाडीपर्यंत पोहचली अन् तेथून काही क्षणात ती मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मात्र हा सर्व प्रकार केतकीच्या वडिलांना आवडला नसल्याने त्यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार करीत आयोजकांनाच याप्रकरणी दोषी ठरविले आहे. त्यांनी म्हटले की, सुरक्षेसंबंधीची कुठलीच व्यवस्था याठिकाणी नव्हती. पोलीस, बाऊन्सर्स किंवा साधा सुरक्षारक्षकही याठिकाणी नव्हता. वास्तविक केतकी येणार असल्याने आयोजकांनी सुरक्षा व्यवस्थेसंबंधी सजग राहणे अपेक्षित होते. मात्र तसे न केल्यानेच केतकीला मनस्ताप सहन करावा लागला. वास्तविक कुठल्याही महिला कलाकारांकरिता हे खूप त्रासदायक असते. सुदैवाने एक वडील म्हणून मी तिथे होतो म्हणून हवी ती काळजी घेऊ शकलो. यापुढे महिला कलाकारांना आमंत्रित करण्याअगोदरच सुरक्षेव्यवस्थेबाबत पुरेसा बंदोबस्त ठेवणे अपेक्षित असल्याचे पराग माटेगावकर यांनी पत्रात नमूद केले आहे.