Join us
Daily Top 2Weekly Top 5

वंचीत मुलींच्या शिक्षणासाठी केतकी माटेगावकरने घेतला पुढाकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 17:58 IST

अनेक मुलींना शिक्षणाची तसेच आयुष्यात खूप पुढे जाण्याची आवड असते, मात्र परिस्थितीमुळे त्या शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे अशा मुलींच्या ...

अनेक मुलींना शिक्षणाची तसेच आयुष्यात खूप पुढे जाण्याची आवड असते, मात्र परिस्थितीमुळे त्या शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे अशा मुलींच्या शिक्षणासाठी केतकी फाउंडेशन स्थापन करुन फाउंडेशनच्या माध्यमातून या वंचीत मुलींना मदत करण्यात येणार असल्याचे सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने जळगावात जाहीर केले. जळगाव येथे खाद्य व कला संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शनिवारी ती जळगावात आली असताना आपल्या उद्घाटनपर मनोगतात तिने ही घोषणा केली. बोलण्यास सुरुवात करताच तिने उपस्थितांना जोरदार नमस्कार करीत जळगावात आल्याचा खूप आनंद झाल्याचे सांगितले. आम्ही माटेगावकर गाव म्हणजे खान्देशातील, त्यामुळे येथे येवून मला घरी आल्यासारखे वाटत असल्याचे केतकी म्हणाली. यश स्वत:साठी ठेवले तर तो स्वार्थ ठरेल.केतकी म्हणाली की, यापूर्वी जी गोष्ट मी कोठे सांगितली नाही, ती जळगावाकरांशी ‘शेअर’ करायची आहे, असे सांगून तिने सर्वांचीच उत्कंठा वाढविली.  ती पुढे म्हणाली की, तानी चित्रपट पाहून खूप मुली मला भेटायला आल्या. त्यात एक मुलगी होती ती रस्ते झाडणारी. ज्यातून तिला केवळ २० रुपये रोज मिळत होता. तिचे मोठे स्वप्न होते, मात्र परिस्थितीमुळे तिचे शिक्षण थांबविण्यात आले होते. तानी चित्रपट पाहून तिच्या आई-वडिलांनी तिचे शिक्षण पुन्हा सुरू केले व आज ती मुलगी चीनमध्ये आहे. अशा कितीतरी मुली आहे, ज्यांना शिक्षण घेऊन मोठे व्हायचे आहे, मात्र परिस्थितीपुढे त्या हारतात. अशा मुलींना शिक्षण मिळावे यासाठी केतकी फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून मुलींच्या शिक्षणासाठी ते काम करणार आहे. तानी व इतर चित्रपटांमुळे मला जे यश मिळाले ते मी केवळ स्वत:साठी ठेवले तर तो स्वार्थ ठरेल, असेही तिने नमूद करीत आपल्या उदात्त हेतूचे दर्शन घडविले. तिच्या या घोषणेला जळगावकरांनी भरभरून दाद दिली. दोन ओळीत आयुष्याचा सारआज ज्यांच्या नावाच्या महोत्सवाचे उद्घाटन माझ्या हस्ते उद्घाटन होत आहे, त्या महान कवीयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याच दोन ओवी मी काकस्पर्श चित्रपटात गायल्या होत्या, याचीही तिने आठवून करून दिली. तसेच ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर....’ या दोन ओळीतच संपूर्ण आयुष्याचा सार सांगणाऱ्या या ओळी असल्याचे ती म्हणाली.