सूरज चव्हाणच्या (suraj chavan) झापुक झुपूक सिनेमाची (zapuk zupuk movie) सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमात सूरज चव्हाणची प्रमुख भूमिका आहे. सूरजला या सिनेमामुळे प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. अशातच काल केदार शिंदेंनी इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. केदार शिंदेंनी 'झापुक झुपूक' सिनेमाला जे ट्रोलिंग होतंय, त्यावर ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. याशिवाय केदार शिंदेंनी (kedar shinde) लोकांना आवाहन केलंय.
ट्रोलर्स सूरजच्या हात धुऊन मागे लागलेत
केदार शिंदे इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून म्हणाले की, "सूरजच्या ज्या चुका असतील त्या सांगा. तो नट म्हणून आता सुरुवात करतोय. यापुढे त्याला मोठं करिअर आहे. सूरजचे फॅन्स कुठे गेलेत तेच कळत नाहीये. ते ट्रोलर्सना का उत्तर देत नाहीयेत? बिग बॉस करत होतो तेव्हा सूरजची प्रसिद्धी बघितली होती. तळागाळातला माणूस सूरजच्या मागे होता. आज नेमकी तीच माणसं कमी दिसत आहेत."
"अशा लोकांना वेळीच थांबवलं नाही तर या महाराष्ट्रातल्या गावखेड्यातला माणूस पुढे येणार नाही. ही गोष्ट एका शहरापुरती मर्यादीत नाही. ही गोष्ट एका शहरापुरती मर्यादीत राहू नये, यासाठी आपण सर्व मराठी माणसांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. गावातला मुलगा आपण स्वीकारणारच नाही का? मी त्याला स्वीकारला."
"मी आजपर्यंत जे १७ सिनेमे केले त्यात वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलं. सोनाली कुलकर्णी कुठुन पिंपरी चिंचवडमधून येते का, मग तिला कशाला घ्यायचं? असा विचार नाही केला. मग सिद्धार्थ जाधव कुठुन येतो तो बहुजन समाजातला आहे का, तर त्याला नाही घ्यायचं! असा विचार कधीच माझ्या मनात नाही आला. ते पण शिकतच होते. आज त्यांची प्रगती दृष्ट लागण्यासारखी आहे. हळूहळू का होईना सूरज त्या लेव्हलला नक्की पोहोचेल."
"पहिल्या टीझरला लोकांनी सूरजला खूप ट्रोल केलं. ट्रेलर आल्यावर थोडे त्यांचे सूर बदलले. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांचे सूर बदलले पण तरीसुद्धा सूरजला ठोकायचंय. म्हणजे त्यांना वेगळं बोलायचंय हे कळतंय पण हा ठरवून काहीतरी वेगळंच बोलतंय. ही गोष्ट माणूस म्हणून मनाला लागण्यासारखी आहे. माणूस म्हणून आपण एकमेकांशी कनेक्ट करु शकलो नाही, तर आपण कपाळकरंटे आहोत हे माझं ठाम मत आहे."