करिना कपूरचा हेअर स्टायलिस्ट पॉम्पी हृद्यांतर चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 11:16 IST
करिना कपूरचा हेअर स्टायलिस्ट पॉम्पी आता एक नव्या करियरला सुरुवात करत आहे. करिनासोबत अनेक वर्षं राहिल्यानंतर आता पॉम्पीलादेखील अभिनयाचे ...
करिना कपूरचा हेअर स्टायलिस्ट पॉम्पी हृद्यांतर चित्रपटात
करिना कपूरचा हेअर स्टायलिस्ट पॉम्पी आता एक नव्या करियरला सुरुवात करत आहे. करिनासोबत अनेक वर्षं राहिल्यानंतर आता पॉम्पीलादेखील अभिनयाचे वेध लागले आहेत. विक्रम फडणवीसच्या हृद्यांतर या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाद्वारे हृतिक रोशन मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. तसेच मनिष पॉलदेखील या चित्रपटात एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सुबोध आणि मुक्ताच्या जोडीने नऊ वर्षांपूर्वी एक डाव धोबीपछाड या चित्रपटात काम केले होते. आता पुन्हा एकदा ते चित्रपटात झळकणार आहेत. हृद्यांतर या चित्रपटाची कथा अतिशय भावस्पर्शी असून सोनाली खरेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. पॉम्पी करिना कपूरसोबत गेली दहा वर्षं काम करत आहे. हृदयांतर या चित्रपटातील कलाकारांचा पॉम्पी लूक डिझाइन करणार आहे आणि त्यासोबत तो चित्रपटात कामदेखील करत आहे. खरे तर पॉम्पी आणि विक्रम अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. त्यामुळे विक्रमने लूक डिझाइनसाठी पॉम्पीला विचारले होते आणि त्याने क्षणाचाही विचार न करता यासाठी होकार दिला. पॉम्पी या चित्रपटात एका विनोदी भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी पॉम्पीच योग्य आहे असे विक्रमचे म्हणणे होते. खरे तर या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी पॉम्पी त्याच्या दुसऱ्या चित्रपटात व्यग्र होता. पण तरीही डबलशिफ्ट करत त्याने या चित्रपटात काम केले.