Join us
Daily Top 2Weekly Top 5

बालमित्रांसाठी “जंगल बुक - द ट्रेझर”लवकरच रंगभूमीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 10:26 IST

मराठी नाट्यसृष्टीत एके काळी बालनाट्याला सुवर्ण दिवस होते. कालांतराने मुलांच्या आवडी निवडी बदलू लागल्या. मनोरंजनाची साधने बदलली. फेसबुक, व्हाट्सअप, ...

मराठी नाट्यसृष्टीत एके काळी बालनाट्याला सुवर्ण दिवस होते. कालांतराने मुलांच्या आवडी निवडी बदलू लागल्या. मनोरंजनाची साधने बदलली. फेसबुक, व्हाट्सअप, मोबाईल गेम आणि विविध अॅप्स यामुळे बालमनाच्या मनोरंजनाच्या संकल्पना पूर्ण बदलल्या.बाल प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेऊन लेखक, दिग्दर्शक रमेश वारंग यांनी “जंगल बुक – द ट्रेझर” या शीर्षकांतर्गत एक आगळं वेगळं बालनाट्य आणले आहे. लक्ष्मी नारायण प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माते मोहन चंद्रकांत चोरघे आणि प्रिती चोरघे यांचं हे बालनाट्य मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रंगभूमीवर येत आहे. या नाटकाची संकल्पना प्रिती चोरघे यांची असून लेखन आणि दिग्दर्शन रमेश वारंग यांनी केले आहे. हे बालनाट्य केवळ मे महिन्याच्या सुट्टीपुरतं मर्यादित नसून पुढे ते वर्षभर सुरू ठेवण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.  सध्याच्या आधुनिक तंत्राला पूरक ठरणारं आंतरराष्ट्रीय धर्तीवर आधारीत या बालनाट्यात क्रिश, स्पायडर मॅन, मोगली आणि चिंगम यासारखी सुप्रसिद्ध पात्र आहेत. परी राज्यातील आल्हाददायी सफर, जादुई, अदभूत, चमत्कारीक असे अनेक प्रसंग यात सादर होणार असून हा थरार प्रथमच बाल प्रेक्षकांना या नाटकातून पाहायला मिळणार आहे. शिवाय बाल प्रेक्षकांचं आवडतं पात्र चेटकीण ही या बाल नाट्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्याचबरोबर अधून मधून या बाल नाट्यातून बाल प्रेक्षकांना थ्रीडीचाही भरपूर अनुभव घ्यायला मिळणार आहे. बाल प्रेक्षकांना खळखळून हसवत, त्यांना या अदभूत नवनिर्मितीचा आनंद देण्याबरोबरच हया नाटकातून मोबाईलचा योग्य तो वापर करा, भाजीपाला खा, आई वडिलांना मदत करा, त्यांची सेवा करा असे अनेक संस्कारक्षम संदेश या नाटकातून देण्यात आले आहे. यात रमेश वारंग अकॅडेमीचे १२/१३ बाल कलाकार काम करीत असून याचे संगीत मंगेश राऊळ यांचे आहे. हया नाटकाचे नेपथ्य वास्तु विशारद प्रिती दळवी चोरघे यांचे असून त्या गेली दहा वर्षे लीड्स आर्कीटेक्चरल कन्सलटंटस मध्ये महाराष्ट्रात कार्यरत आहेत. या नाटकाचे व्यवस्थापक शेखर दाते असून प्रकाश शांताराम सागवेकर यांचे सहकार्य लाभले आहे. या बालनाट्याचे मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रयोग सादर करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. रमेश वारंग हया नाट्यवेड्या धडपडया तरुणाने नाट्यसृष्टीत सतत काहींना काही करायचा चंग बांधला आहे. त्याच अनुषंगाने त्याने याआधी वेगळ्या आशयाचे “एक चावट मधुचंद्र”, “नेता आला रे” आणि ४० वर्षावरील प्रोढांना घेऊन “अभी तो हम जवान है” हया नाटकांची यशस्वी निर्मिती केली आहे. तसेच “छोटा भीम” आणि “माय आयडॉल डॉ. अब्दुल कलाम” हया दोन बालनाट्याचीही निर्मिती केली आहे. सध्या त्यांचे “ही स्वामींची इच्छा” हे नाटक जोरात सुरू असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.