जय-वीरूची आठवण :'फ्रेंड'शिप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 23:32 IST
शोलेमधली वीरू आणि जयची जोडी तुम्हाला आठवते? एकेकाळी अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्या जोडीने चित्रपटसृष्टीत मैत्रीचं एक भन्नाट वादळ निर्माण ...
जय-वीरूची आठवण :'फ्रेंड'शिप
शोलेमधली वीरू आणि जयची जोडी तुम्हाला आठवते? एकेकाळी अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्या जोडीने चित्रपटसृष्टीत मैत्रीचं एक भन्नाट वादळ निर्माण केलं होतं. विनोदांचे कारंजे फुलवत नि:स्वार्थपणे जपलेली ही मैत्री आजही जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते. या जोडीचा अभिनय अजूनही ताजा-टवटवीत वाटतो.. याच जोडीची पुन्हा आठवण करून देणारा मराठीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी याचा 'फ्रेंड्स' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. अख्ख्या तरुणाईला 'दुनियादारी' करायला लावणारा स्वप्नील, हँडसम सचित पाटील सोबत अभूतपूर्व मैत्री निभावून नव्या वर्षात आपल्या भेटीला येतोय.कशी आहे दोघांमधली दोस्ती? काय आहे या दोस्तीचा दुवा? का टिकून आहे ती? असे कितीतरी प्रश्न आपल्याला या निमित्ताने पडले असतील. अर्थात याची उत्तरं आपल्याला चित्रपटगृहात जाऊनच शोधावी लागतील. कौटुंबीक असूनही विनोदी आणि तितकाच हा अँक्शनपट आहे. तो कसा तर 'मुंबई-पुणे-मुंबई' नात्याची मजा जशी हळूवार उलगडण्यात आली तशी 'फ्रेंड्स'ची मजा चित्रपटगृहात जाऊन पाहण्यातच आहे.१९९३ साली कृष्ण या हिंदी मालिकेत लहान वयातील कृष्णाची भूमिका साकारून स्वप्नीलच्या अभिनयाची सुरुवात झाली. २00८ साली 'चेकमेट' या चिटपटाद्वारे तो प्रमुख भूमिकेत दिसला. त्यानंतर टार्गेट, दुनियादारी असे कितीतरी चित्रपट केले. पाच वर्षांपूर्वी आलेल्या 'मुंबई-पुणे-मुंबई' या स्वप्नीलच्या चित्रपटाने उत्तुंग यश मिळवले.आता प्रसिद्ध होणार्या 'फ्रेंड्स' या सिनेमात स्वप्नील जोशी हा लव्हरबॉय प्रेक्षकांना डॅशिंग आणि आक्रमक भूमिकेत दिसेल. या सिनेमातून पहिल्यांदाच मराठी सिनेमात मुंबई मेट्रो आणि इनडोअर फुटबॉल कोर्ट दिसणार आहे. सोबतच मुंबईतील अशा अनेक जागा ज्या मुंबईकरांनी मोठय़ा पडद्यावर कधीच पाहिल्या नसतील, त्यांचंही पहिलं ऑनस्क्रीन दर्शन या सिनेमातून होईल. मराठीत अशा कितीतरी गोष्टी ज्या पहिल्यांदाच येत आहेत, हे या चित्रपटाच्या निमित्ताने पहावयास मिळेल.यातील स्वप्नीलच्या भूमिकेविषयी दिग्दर्शक आर. मधेश सांगतात, स्वप्नील हा मराठीतला आघाडीचा कलाकार आहे. मराठी सोबतच त्यानं हिंदीतही आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. खरं तर मराठी अभिनेत्यांना नाटकाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ते उत्तम काम करू शकतात. त्यांच्याकडून काम काढून घेण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागत नाहीत. केवळ आर्थिक बाजू सोडली तर मराठीत नाव ठेवण्यासारखं काहीच नाही.