Join us
Daily Top 2Weekly Top 5

“ही स्वामींची इच्छा”लवकरच रंगभूमीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 11:13 IST

देव आहे किंवा नाही असं मानणारी अनेक आस्तिक व नास्तिक मंडळी समाजात पाहायला मिळतात. काहींना देवाचं अस्तित्व जाणवतं, काहींना ...

देव आहे किंवा नाही असं मानणारी अनेक आस्तिक व नास्तिक मंडळी समाजात पाहायला मिळतात. काहींना देवाचं अस्तित्व जाणवतं, काहींना नाही. काहींना देवाची प्रचिती येते, काहींना नाही. देव तुमच्या आमच्यातच असतो, पण तो ओळखता येत नाही. संकटसमयी जो मदतीला धावून येतो तोच खरा देव. मग हा देव कोणत्या रूपात मदतीला येईल ते सांगता येत नाही. देवत्वाची प्रचिती देणारं “ही स्वामींची इच्छा” हे संदेशात्मक नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. आर्वी थॅंक्स एंटरटेनमेंट, सिद्धांत प्रॉडक्शन निर्मित “ही स्वामींची इच्छा” हे नाटक एका सत्य घटनेवर आधारित असून हया नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन रमेश अनंत वारंग यांनी केले आहे. हे नाटक नावावरून जरी आध्यात्मिक वाटत असले तरी यात केवळ अध्यात्मिकता नसून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या नाटकात एकही नावाजलेला कलाकार नसून सर्वाच्या सर्व उदयोन्मुख कलाकारांनी नाटकाची धुरा सांभाळली आहे.अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ समस्त महाराष्ट्राचे आवडते दैवत आहे. आज स्वामीचे लाखो भक्त महाराष्ट्रात आहेत. अशाच एका स्वामी भक्ताची कथा हया नाटकात दाखविण्यात आली आहे. हे नाटक एका स्वामी भक्त असलेल्या गरीब मुलाच्या जीवनावर आधारित आहे. त्याला सायकल घ्यायची खुप इच्छा असते. पण ती सायकल घ्यायची ऐपत नसल्यामुळे तो स्वामींकडे गार्‍हाणे घालतो. आणि काय चमत्कार ! त्याला पैशाचं एक पाकीट मिळतं आणि तो सायकल घ्यायला जातो. पण दुर्दैव, काही गुंड लोक त्याचे पैसे पळवतात. त्याला राग येतो. हया सर्वाला तो स्वामींनाच जबाबदार धरतो आणि स्वामींच्या समोर प्रतिज्ञा करतो की, तुमच्या मदतीशिवाय मी मोठा होऊन दाखविन. पुढे तो स्वत:च्या हिमतीवर, जिद्दीने आपलं ध्येय गाठतो व मोठं नाव कमवतो. त्यावेळी त्याच्या मनात एकच विचार असतो की स्वामींच्या मदतीशिवाय मी माझं ध्येय गाठलं. पण त्याला हे माहीत नसतं की त्याला आजवर ज्यांनी ज्यांनी मोठं होण्यासाठी मदत केली ती सर्व स्वामींचीच रूपं होती. पण ती त्याला ओळखता आली नाही. हे कथेद्वारे हया नाटकातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ किंवा ‘अशक्यही शक्य करतील स्वामी’ हया उक्तीप्रमाणे जेव्हा जेव्हा मोठं संकट येईल तेव्हा घाबरू नका, त्या संकटासोबत एक मोठी संधी दिलेली असते. ती ओळखून आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर करायचा असतो. हाताच्या रेषेवर विश्वास न ठेवता आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर स्वत:च्या कल्पनाशक्तीने मेहनतीने व चिकाटीने जग जिंकता येतं, हे हया नाटकाद्वारे लेखक – दिग्दर्शक रमेश वारंग यांनी आजच्या तरुण पिढीला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. “ही स्वामींची इच्छा” हया नाटकात साईराज बेलोसे, शुभम हिंदळेकर, कृतार्थ गोईम, आर्यन भिसे, उद्धव रिसबुड, पुर्वा नलावडे, निर्मिती नागोटकर, अनुष्का तांदळेकर, मधुकर सोलकर, संस्कृती नागोटकर, लक्ष्मण वारखंडकर, दिक्षा गुरव, पुर्वा शिर्के, नारायण अहिरराव, दिशा शिर्के, मनोहर सावंत, जुई शिर्के, रश्मी सहस्त्रबुद्धे, आरती परब, पियुस ठाकरे, अरुण वाट, विनायक घाडीगावकर, सायली करुळकर, मनोज गुंड, मनिषा शिरोडकर, अरुण बेल्हेकर, राजेंद्र जाधव, संयुक्ता माधव, सुरेखा विळेकर यांच्या भुमिका आहेत. हया नाटकाचे संगीत प्रज्योत पावस्कर, प्रकाश योजना मंगेश पेडणेकर, जाहिरात डिझाईन अक्षर कमल शेडगे यांनी केले असून डॉ. शांताराम कारंडे फॅन फाऊंडेशन, नवक्षितिज प्रतिष्ठान, अजित रावराणे, शेखर दाते, गणेश तळेकर यांनी विशेष सहकार्य केले आहे.