'वामा-लढाई सन्मानाची' (Vama-Ladhai Sanmanachi Movie) या आगामी मराठी चित्रपटातील धमाकेदार गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलचे 'फायर ब्रिगेडला बोलवा' हे धमाल गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच चित्रपटातील 'गुटूर गुटूर' हे जबरदस्त आयटम साँग भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीत, नृत्य, एनर्जी यामुळे हे गाणे प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. स्नेहा गुप्ताची कातील अदा प्रेक्षकांना भुरळ पाडणारी असून सगळ्यांना थिरकायला लावणाऱ्या या गाण्याला कविता राम यांचा आवाज आहे. तर रिजू रॉय यांचे धमाल संगीत लाभलेल्या या गाण्याला मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. तसेच या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मुद्दासर खान यांनी केल्याने गाण्याला चारचांद लागले आहेत.
दिग्दर्शक अशोक आर. कोंडके म्हणतात, '''फायर ब्रिगेडला बोलवा' या गाण्याला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो. आता प्रेक्षकांसाठी 'गुटूर गुटूर' हे आयटम साँग घेऊन आलो आहोत. उत्तम संगीत, नृत्य, गाण्याचे बोल या सगळ्यांनेच गाण्याची रंगत वाढली असून हे गाणेही प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.''
निर्माते सुब्रहमण्यम के. म्हणतात, '''वामा- लढाई सन्मानाची' हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणार आहेच परंतु प्रेक्षकांचे मनोरंजनही करेल. आजच्या काळात मनोरंजनाबरोबरच उत्तम आशय देणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि आम्ही हा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.''
ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के. निर्मित 'वामा - लढाई सन्मानाची' चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.