‘शुभम भवतू’ या डायलॅागमुळे घरोघरी लोकप्रिय झालेले अभिनेते डॉ. विलास उजवणे (Dr. Vilas Ujawane) सध्या आर्थिक संकटात आहेत. विविध आजारांनी ग्रासलेल्या उजवणे यांच्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट लिहून आवाहन करणारे लेखक-अभिनेते राजू कुलकर्णी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, विलास यांना कोल्हापूरहून मुंबईत आणण्यात आल्यानंतर पत्नी अंजली यांच्या ठाण्यातील घरी ते राहिले, पण रात्री त्रास होऊ लागल्याने मेट्रोपोल रुग्णालयात नेण्यात आले.
सर्वांचे पैसे मी परत करेन - अंजली उजवणे विलास उजवणेंच्या पत्नी अंजली ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या की, त्यांचा बीपी आणि शुगर लेव्हल खूप कमी झाली आहे. दुर्मिळ अशी रक्ताची कावीळ झाली आहे. सोशल मीडियावरील आवाहनानंतर कलाकार, रसिक आणि सर्वसामान्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मदत करणाऱ्यांचे ऋण कधीही विसरणार नाही, पण सर्वांची नावे आणि अकाऊंट नंबर्स मी लिहून ठेवणार असून, सर्वांचे पैसे परत करणार आहे.