Join us

"नाटकांमधून अशी काही नाती मिळालीत जी शब्दाविना...", नीना कुळकर्णींची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:41 IST

Neena Kulkarni : नुकतेच नीना कुळकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी आशा काळे, आशालता वाभगावकर, काशीनाथ घाणेकर आणि बऱ्याच दिग्गज कलाकारांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठीसह हिंदीतही काम केले आहे. त्यांनी विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. नुकतेच नीना कुळकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी आशा काळे, आशालता वाभगावकर, काशीनाथ घाणेकर आणि बऱ्याच दिग्गज कलाकारांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

नीना कुळकर्णी यांनी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि लिहिले की, ''माझ्या आशाताई ….आशा काळे. १९७० मध्ये गुंतता हृदय हे ह्या नाटकात एका भूमिकेसाठी माझी निवड केली गेली. ह्यात मी आशाताईंची (महानंदा ) आणि डॉ काशीनाथ घाणेकर (बाबुल) ह्यांच्या मुलीची भूमिका करायचे. ५ वर्ष त्या नाटकात काम करत मी ग्रॅज्युएट झाले! तेव्हापासून आजपर्यंत आशाताईंशी माझी प्रेमाची, आपुलकीचीची गाठ बांधली गेली आहे ती आजतागायत! मध्यंतरीच्या काळात आशाताई माझ्या नाटकाला आल्या …असेन मी नसेन मी.'' 

''मला आकाश ठेंगणं झालं!''

त्यांनी पुढे म्हटले की, ''मला आकाश ठेंगणं झालं! माझ्या करता आशाताई घरच्या आहेत…आणि घरची मंडळी आपले काम पाहायला आली की काय घालमेल होते जीवाची ! कलाकारच जाणो! आशाताई आल्या, नाटक पाहिले, ‘नानी’ किती मोठी झालीस गं! म्हणत मला जवळ घेऊन ज्या मायेने त्यांनी चेहऱ्यावरून हात फिरवला …. त्यातच सर्व आले! मी सुदैवी आहे. मला नाटकांमधून अशी काही नाती मिळाली आहेत जी शब्दाविना खूप काही देऊन जातात …नव्हे, देत राहतात. आशा काळे, आशालता वाभगावकर, पद्मा चव्हाण, मालती पेंढारकर, काशीनाथ घाणेकर, अरुण सरनाईक, मंदाकिनी भडभडे, मधुकर तोरडमल …. किती नावे घेऊ? अर्थात विजया मेहता हे नाव आणि व्यक्तिमत्व तर माझ्या अभिनय कारकिर्दीचा उच्चांक म्हणायचा.. त्यांचा सहवास लाभणे ही पर्वणी ठरली माझ्याकरता.''

 ''‘असेन मी नसेन मी’ मुळे अनेक असे कलाकार पुन्हा भेटले की ज्यांच्या बरोबर मी अगदी लहान असताना काम केले…सुमन ताई धर्माधिकारी नाटकाला आल्या…९० दी च्या पुढच्या. त्यांच्याबरोबर मी चांदणे शिंपीत जा ह्या नाटकाचे काही प्रयोग, ८ वीत असताना केले होते! माझ्या कडे सर्वांचे फोटो सुद्धा नाहीत, पण मनात स्पष्ट, स्वच्छ प्रतिमा आहेत …कायमच्या कोरलेल्या. ही अशी नाती, ही आपुलकी , हे प्रेम, कौतुक, केवळ रंगभूमी मुळे प्राप्त झालेत ही जाणीव होते आणि ऊर भरून येते. कृतज्ञता,अप्रूप ह्या भावनांनी मन उचंबळून येते'', असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.