Join us

'माझं जहाज बुडालं असं वाटलं...', पहिल्या पत्नीच्या निधनानंतर लक्ष्मीकांत बेर्डे गेले होते कोलमडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 06:00 IST

Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक धमाल किस्से तुम्ही आजवर ऐकले असतील. आज त्यांच्या बाबतीतला आणखी एक किस्सा जाणून घेऊयात.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्रीत सहसुंदर अभिनयानं, विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे अढळ स्थान निर्माण केले होते. आजही त्यांचे चित्रपट तितक्यात आवडीने पाहिले जातात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक धमाल किस्से तुम्ही आजवर ऐकले असतील. आज त्यांच्या बाबतीतला आणखी एक किस्सा जाणून घेऊयात. 

खरेतर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बालपणी तिकीट कंडक्टर बनायचं स्वप्न होतं. तिकिटाचे सगळे पैसे घरी घेऊन यायच. मात्र हे दिवसभर जमा झालेले पैसे परत द्यावे लागतात, हे त्यांना फार उशिरा समजले. दरम्यान आपला मुलगा मॅट्रिक पास होणार नाही, अशी खात्री लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वडिलांना होती. तेव्हा वडिलांनी एका कंपनीत नोकरीला लावले. ही नोकरी मनाविरुद्ध असल्याने त्यांनी जेमतेम महिनाभर केली आणि नोकरीला कायमचा रामराम ठोकला.

नाटकातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकादरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री रुही यांच्यासोबत लग्न केले. दरम्यान रुही बेर्डे यांनी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा चांगला ठसा उमटवला होता. आ गले लग जा हा रुही यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. रुही यांची आराम हराम आहे, डार्लिंग डार्लिंग, दोस्त असावा तर असा, दुनिया करी सलाम, जावई विकत घेणे आहे. मामला पोरींचा हे मराठी चित्रपट, नाटक खूप गाजले.

रुही बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यात आली आणि त्यांना खरी लक्ष्मी प्राप्त झाली असे म्हटले जाते. त्यांच्या येण्याने लक्ष्मीकांत हे नाव लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. सुरुवातीला रुही यांना अनेकदा मुलाखतीसाठी बोलावले जायचे. पण लक्ष्मीकांत सुद्धा हरहुन्नरी कलाकार आहे तुम्ही त्याचीही मुलाखत घ्या असे त्या आवर्जून सांगत असत. रुही यांच्यासोबत १५ वर्षांच्या संसारात लक्ष्मीकांत यांच्या आईचे मग नंतर वडिलांचे निधन झाले. मात्र रुही यांनी त्यांची कमी कधीच भासू दिली नाही, हे लक्ष्मीकांत बेर्डे आवर्जून सांगायचे.

पण जेव्हा ५ एप्रिल १९९८ रोजी रुहीचे निधन झाले. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे पूर्णपणे खचून गेले होते. यादरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे कोणाशीही बोलत नव्हते. या दुःखद प्रसंगानंतर जवळपास तीन महिन्यांनी त्यांनी एक मुलाखत दिली होती. या प्रसंगामुळे माझे जहाज बुडाले असे मला वाटल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले होते. 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डे