मराठी नाटकांना फार मोठी परंपरा लाभली आहे. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, विनोदी, फार्स, रहस्यमय अशा वैविध्यपूर्ण नाटकांनी रंगभूमी समृद्ध केली. मराठी रंगभूमीवर काळानुरूप, प्रेक्षकांच्या वयोगटानुसार तसेच अभिरुचीनुसारही येणाऱ्या नाटकांचे प्रकार आणि सादर करण्याचे प्रकार सतत बदलत राहिले. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ आणि ‘करायला गेलो एक’ या दोन यशस्वी नाटकांनंतर किशोर सावंत आता विवेक नाईक यांच्या साथीने ‘अपराध मीच केला’ हे गाजलेलं सलग तिसरे नाटक प्रेक्षकांसाठी घेऊन येताहेत. मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं हे नाटक त्याकाळी तुफान गाजले होते. ‘अपराध मीच केला’ या नाटकाचे दिग्दर्शन विजय गोखलेच करणार आहेत. ‘किवि प्रॉडक्शन्स’च्या या नाटकात आजचे आघाडीचे कलाकार रमेश भाटकर यांच्यासोबत विजय गोखले, विघ्नेश जोशी, यश जोशी आणि स्वतः किशोर सावंत काम करणार आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात हे नाटक रंगमंचावर आणण्याचा त्यांचा मानस आहे. किशोर सावंत यांनी अभिनयासोबत नाट्य निर्मितीत प्रवेश करीत ‘किशोर थिएटर्स’चा तीन वर्षांपूर्वी शुभारंभ केला. किशोर सावंत यांनी १९८० सालापासून नाटक, एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे १९६४ साली रंगमंचावर आलेले नाटक किशोर सावंत यांनी त्यांच्या ‘किशोर थिएटर्स’ संस्थेतर्फे ५ दशकांनंतर नव्या संचात रंगमंचावर आणले. या नाटकाचे आतापर्यंत ६० यशस्वी प्रयोग सादर झाले असून त्यांची ही घौडदोड नेटाने सुरु आहे. व्यावसायिक रंगभूमीवर अभिनयाचे धडे किशोर त्यांनी विजय गोखले यांच्या तालमीत गिरविले असून रंगमंचावरचा वावर, देहबोली, संवादफेक असे अभिनयाचे बारकावे त्यांच्याकडूनच आत्मसात केल्याचे किशोर सावंत आवर्जून सांगतात.
अपराध मीच केला’ लवकरच रंगमंचावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 14:56 IST