Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘शिकारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 16:36 IST

चित्रपटांसाठी केलेली वेगळ्या वाटेवरील कथांची निवड आणि त्यांना दिलेल्या वेगळ्या हाताळणीसाठी महेश वामन मांजरेकर ओळखले जातात. त्यांचा ‘शिकारी’ नावाचा ...

चित्रपटांसाठी केलेली वेगळ्या वाटेवरील कथांची निवड आणि त्यांना दिलेल्या वेगळ्या हाताळणीसाठी महेश वामन मांजरेकर ओळखले जातात. त्यांचा ‘शिकारी’ नावाचा नवीन मराठी चित्रपट येत असून त्याचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांनी केले आहे आणि हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट २० एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि टीजर्स नुकतेच सार्वजनिक झाले आणि सिनेरसिकांमध्ये काही प्रमाणात खळबळ माजली.  ‘शिकारी’ हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी प्रस्तुत केला असून आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंटचे विजय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद वैद्यनाथन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.गाजलेली मराठी मलिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने घराघरात पोहोचलेला आणि स्वतःचे असे वेगळे स्थान अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण केलेला सुव्रत आणि नेहा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा या चित्रपटातून चित्रपटसृष्टीतील आपले पदार्पण करत आहे. त्यांच्याबरोबर कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.  अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा धांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.या चित्रपटाची पोस्टर्स सार्वजनिकपणे नुकतीच झळकली आणि मराठी चित्रपट रसिकांमध्ये त्याबद्दल चर्चा सुरु झाली. हा चित्रपट विनोदी आहे की ती एक सेक्स कॉमेडी आहे की मग ती एक सामाजिक अंगाने जाणारी नाट्यमय कलाकृती आहे, याबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. महेश वामन मांजरेकर हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता असल्याने आणि विजू माने यांचे दिग्दर्शन असल्याने ही चर्चा अधिक रंगली आहे.  “शिकारी’चा विषय वेगळा आणि मस्त होता त्यामुळे त्यावर काम करायला मजा आली. तो एक विनोदी आणि संपूर्णतः व्यावसायिक चित्रपट आहे. विनोदाचे बादशाह दादा कोंडके यांना आम्ही वाहिलेली ती एक मानवंदना आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की, तुम्हाला आणि विशेषतः मुलींना जर या ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करायचा असेल तर खुशाल या, पण आंधळेपाने वावरू नका.” असे “शिकारी’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता महेश वामन मांजरेकर म्हणाले.‘शिकारी’चे दिग्दर्शक विजू माने म्हणतात, “स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाऱ्या श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन या कथेचे करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे. महेश मांजरेकर ह्या सिनेमात प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेत असले तरी हा सिनेमा आकार घेत असताना त्यांनी देलेले योगदान खूप खूप मोठे आणि अनुभवसिद्ध आहे.”चित्रपटाचे निर्माते आणि आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील म्हणाले, “शिकारी’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. हा चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांनी दिग्दर्शित केला असून बहुआयामी व्यक्तिमत्व महेश मांजरेकर यांनी त्याचे सादरीकरण केले आहे. माझे वडील एस आर पाटील यांनी पूर्वी ‘बायको असावी अशी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात माझ्या वडिलांनी मध्यवर्ती भूमिका ही केली होती. तो चित्रपट मनोरंजन आणि सामाजिक संदेश यांचे अचूक मिश्रण होते आणि आता २० एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित होत असलेला शिकारी’ या आमच्या चित्रपटातून आम्ही अशाच प्रकारची संकल्पना मांडली आहे.