Join us

‘ती फुलराणी’ गाठणार शंभरचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 11:17 IST

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.ल देशपांडे यांच्या लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेले नाटक म्हणजे ती फुलराणी. या नाटकातील ...

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.ल देशपांडे यांच्या लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेले नाटक म्हणजे ती फुलराणी. या नाटकातील ती फुलराणीची भूमिका अनेक तगड्या मराठी अभिनेत्रींनी साकारली आहे. यामध्ये भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष या कलाकारांचा समावेश आहे. या अभिनेत्रीनंतर आता ती फुलराणीची  भूमिका अभिनेत्री हेमांगी कवी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडतीय. तिच्या या नाटकाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळताना दिसत आहे. तिचे हे नाटक आता शंभरचा टप्पा गाठणार असल्याचे हेमांगीने लोकमत सीएनएक्सला सांगितले. हेमांगी म्हणते, सध्या मराठी नाटकांच्या संख्येचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा या नवीन नाटकांच्या गर्दीमध्ये एखादे जुन्या नाटकाने आपले स्थान कायम ठेवणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सध्या चित्रपट, मालिका, रियालिटी शो अशा पध्दतीने मनोरंजनाची माध्यमे वाढली आहेत. ही सर्व माध्यमे असून देखील प्रेक्षकांचा ती फुलराणी प्रतिसाद पाहून खरचं खूप छान वाटतं. तसेच आमच्या नाटकांचे निर्माते यांचेदेखील खूप कौतुक करावेसे वाटते. कारण त्यांनी ही तयारी दर्शविली. या नाटकाचा शंभरावा प्रयोग नक्कीच प्रेक्षकांना पुढील महिन्यात पाहायला मिळेल. पण हे नाटक कुठे असणार आहे अजून गुलदस्त्यात असल्याचे तिने यावेळी सांगितले.  या नाटकाचे लेखन नाट्यदिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी केले आहे. अष्टगंध एंटरटेण्मेंट निर्मित एँडोनिस एण्टरप्रायजेस प्रकाशित ती फुलराणी  हे नाटक  आहे. धनंजय चाळके याचे निर्माते आहेत.ती फुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवी सोबत प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ गिरीश ओक आहेत. सोबत मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, विजय पटवर्धन, निरंजन जावीर, हरीश तांदळे, दिशा दानडे, सुनील जाधव, अंजली मायदेव या कलाकारांचा समावेश आहे.