प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन झालंय. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८० वर्षांचे होते. गोव्यामध्ये जन्म झालेल्या प्रभाकर कारेकर (prabhakar karekar) यांनी संगीतविश्वात स्वतःची ओळख निर्माण केलीय. बुधवारी रात्री शिवाजी पार्क येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. 'बोलावा विठ्ठल' आणि 'वक्रतुंड महाकाय' या गाण्यांनी प्रभाकर कारेकर यांना ओळख मिळाली
उत्कृष्ट गायक आणि शिक्षक म्हणून प्रभाकर कारेकर ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर त्यांच्या गायनाचं सादरीकरण केलं. पं. जितेंद्र अभिषेकी, पं. सुरेश हळदणकर, पं. सी.आर. व्यास अशा दिग्गज गायकांकडे कारेकरांनी गायनाचे धडे गिरवले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंं. प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली वाहिली. प्रमोद सावंत यांनी X वर ट्विट करुन पोस्ट लिहिलीय.
"हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनाची वार्ता ऐकून खूप दुःख झालं. त्यांनी गोव्यातील अंत्रुज महाला येथे जन्म घेतला. पुढे पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. जगातील अनेक व्यासपीठांवर त्यांनी गायन कला सादर केली. गोव्यात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी त्यांनी बहुमुल्य योगदान दिलंय. त्यांचा संगीत वारसा त्यांचे शिष्य आणि चाहते पुढेही चालू ठेवतील." अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पं. प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.