Join us
Daily Top 2Weekly Top 5

​हा प्रसिद्ध मराठी अभिनेता बनला दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 12:01 IST

सखी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता दिग्पाल लांजेकर प्रेक्षकांना आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याने सखी प्रमाणे अस्मिता ...

सखी या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता दिग्पाल लांजेकर प्रेक्षकांना आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याने सखी प्रमाणे अस्मिता या मालिकेत देखील काम केले होते. एक अभिनेता हीच केवळ दिग्पालची ओळख नाहीये. तो एक चांगला लेखक देखील आहे. तू माझा सांगाती या मालिकेची कथा त्याने लिहिली होती. दिग्पालने आज एक अभिनेता आणि लेखक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या वर्षभरापासून तो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये झळकत नसल्याने तो कुठे आहे याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. तो त्याच्या एका प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याचे म्हटले जात होते. त्याचे हे प्रोजेक्ट म्हणजे त्याचा आगामी चित्रपट असून या चित्रपटाची त्याने नुकतीच सोशल मीडियाद्वारे घोषणा केली आहे. या चित्रपटात दिग्पाल प्रेक्षकांना अभिनेत्याच्या नव्हे तर दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दिग्पालचा ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास प्रचंड आहे. अनेक संत, महापुरुष यांच्याविषयीचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. त्याने प्रचंड अभ्यास करून तू माझा सांगाती ही मालिका लिहिली होती आणि आता त्याने एका ऐतिहासिक विषयावर चित्रपट बनवला आहे.दिग्पालच्या चित्रपटाचे नाव फर्जंद असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. हा चित्रपट एक शिवकालीन युद्धपट असून मे २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्पाल गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असून या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. फर्जंद या चित्रपटाच्या पहिल्या लूकमध्ये शिवाजी महाराजांची छबी आपल्याला पाहायला मिळत असून एका डोंगरावर त्यांचा एक मावळा दिसत आहे. या मावळ्याच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात ढाल आहे. या चित्रपटाचे लेखन देखील दिग्पालनेच केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिरबान सरकार यांनी केली असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्निल पोतदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. दिग्पालने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याच्या फॅन्सना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.