Join us
Daily Top 2Weekly Top 5

​'बबन' मधील हौसाबाई..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 12:25 IST

23 मार्च ला भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि मराठी सिनेसृष्टीला बरेच चांगले आणि ...

23 मार्च ला भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित 'बबन' हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि मराठी सिनेसृष्टीला बरेच चांगले आणि गुणी कलाकार मिळाले. त्यातलीच एक म्हणजे कृतिका तुळसकर. बबन या सिनेमात हौसा नावाच्या बाईची व्यक्तीरेखा ती साकारतेय. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटगृहातुन निघताना बरेच प्रेक्षक ती व्यक्तीरेखा सोबत घेऊन बाहेर येत आहेत. या व्यक्तीरेखेसाठी तिने खूप मेहनत घेतली. तसेच12 किलो वजन तिने वाढवलं. ती शहरात वाढलेली मुलगी असून त्या भूमिकेसाठी ती नगरी भाषा शिकली. त्या गावांमध्ये जाऊन राहून तिथल्या लोकांसोबत शेतीची कामे केली. हिंदी सिनेमातून स्वतःच्या फिल्म इंडस्ट्रीतील करियरची सुरुवात करणाऱ्या कृतिकाने आतापर्यंत 11 पेक्षा जास्त सिनेमांतून काम केलं आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून रंगभूमीवर ती काम करत असून आतापर्यंत हिंदी, गुजराती, इंग्रजी अशा शेकडो नाटकांमधून तिने भूमिका केल्या आहेत. प्रायोगिक नाटकांमधून तिने अनेक बक्षीसे मिळवली आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर तिने अनेक नाटकांमधून अभिनय केला आहे. प्रीती संगम, मोरूची मावशी, लग्न बंबाळ, आई तुला कुठे ठेऊ अशी अनेक नाटके तिने केली आहेत. सध्या तिचे मकरंद अनासपुरे यांच्या सोबत 'उलट सुलट' नावाचे नाटक खूप गाजत आहे. त्याशिवाय ती कथ्थक  विशारदही  आहे. मूळची सायकॉलॉजिस्ट असूनसुद्धा तिने करियर म्हणून अभिनय क्षेत्र निवडले ही कौतुकाची बाब आहे. बबन हा चित्रपटाने १० कोटींचा आकडा पार केला असून याच्या मार्केटिंग पद्धतीचा शास्त्रीय अभ्यास केला जात आहे. चित्रपटाच्या कथेबरोबरच, दिग्दर्शनातील बारकावे आणि मार्केटिंगचे फंडे हे सुद्धा या चित्रपटाच्या यशाचे गमक आहे. चित्रपटाच्या मार्केटिंगची धुरा राजू अनासपुरे यांनी सांभाळली असून त्यांनीही चित्रपटामध्ये लहानशी भूमिका केली आहे.