काही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पोहचवण्यासाठी मुरबाडजवळील फांगणे गावात आजींबाईंची शाळा सुरू करण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल जगभरातून घेण्यात आली आहे. आता ही आजींची शाळा मोठ्या पडद्यावर भरणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन युसूफ खान करत असून या चित्रपटाचे लेखन आशिष निनगुरकर करणार आहेत.
शिक्षणाला वयाचे बंधन नसते. वयाच्या कोणत्याही वळणावर शिक्षण सुरू करता येते. उमेदीच्या काळात जगण्याच्या स्पर्धेत शिक्षणापासून दुरावलेल्या वयोवृद्ध महिलांना अक्षर ओळख करून देण्याच्या उद्देशाने प्राथमिक शाळेतील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी ही शाळा सुरू केली. वयाची साठी ओलांडलेल्या अनेक आजीबाई नियमाने या शाळेत अक्षरे गिरवण्यासाठी येत होत्या. त्यातून गावातील सर्व वयोवृद्ध महिला अक्षर ओळख, स्वाक्षरी करणे अशा अनेक गोष्टी शिकल्या. या उपक्रमाची दखल देशासह जगभरातील संस्था, वृत्तवाहिन्या आणि व्यक्तींनी घेतली. आता हीच कथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.चित्रपटाचे दिग्दर्शक युसूफ खान हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा यांच्यासोबत मुख्य सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या रेस ३ या सिनेमात त्यांनी मुख्य सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. अनेक पुरस्कार सोहळे व म्युझिक अल्बमचे नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या सिनेमाचे लेखक आशिष निनगुरकर यांनी रायरंद या सामाजिक विषयावर आधारीत चित्रपटाचे लेखन केले असून या सिनेमाला अनेक चित्रपट महोत्सवात गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांनी लिहिलेला एक होतं पाणी हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.