Join us

‘देवा...एक अतरंगी’ येत्या शुक्रवारी सिनेमागृहांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:52 IST

इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित तसेच मुरली नलप्पा दिग्दर्शित ‘देवा...एक अतरंगी’ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. ...

इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित तसेच मुरली नलप्पा दिग्दर्शित ‘देवा...एक अतरंगी’ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रत्येकामध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा असा ड्रामा, थ्रिलर, रोमान्सचा धमाका आहे.  प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच या चित्रपटाच्या टीमने लोकमत ऑफिसला भेट दिली आणि अतरंगी देवा उलगडला.

मायाची भूमिका साकारणारी तेजस्विनी पंडित या चित्रपटामध्ये लेखिकेच्या भूमिकेत आहे. तिच्या आयुष्यात येणारे देवा हे अतरंगी कॅरेक्टर आहे. अंकुश चौधरीने साकारलेल्या देवासारखीच मायाही अतरंगीच आहे. ती कुठलीही गोष्ट ठरवून करत नाही. ती सतत फिरतीवर असते आणि नावीन्य शोधण्याचा प्रयत्न करत असते. नावाप्रमाणेच खूप प्रेमळ आणि सर्वांना माया लावणारी अशी ही माया आहे. 'देवा' हा प्रत्येकाची प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दोघांमधला समान धागा  म्हणजे त्यांचा अतरंगी आणि मदत करण्याचा स्वभाव. देवा, माया आणि स्पृहा जोशीने साकारलेली मीरा या पात्रांभोवती फिरणारी चित्रपटाची संपूर्ण कथा आहे.आपल्या सर्वांच्याच आयुष्यात खूप अडचणी आणि त्रास असतात. काहीवेळा अतिशय साध्या वाटणाऱ्या गोष्टींना आपण क्लिष्ट बनवतो. छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद कसा द्यावा घ्यावा हे सांगणारा हा चित्रपट आहे.

यावेळी लोकमतशी बोलताना दिग्दर्शक मुरली नलप्पा म्हणाले की, हा सिनेमा बनवणं हे माझ स्वप्न होत. मला असे वाटले की ही सिनेमाची जी गोष्ट आहे ती फक्त दाक्षिणात्यांपुरतीच मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. सिनेमा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक जरी असला तरी आम्ही त्यातली फक्त गोष्ट घेतली. कुठल्या प्रकारची तडजोड न करता मराठी संस्कृती, परंपरा, सण, पद्धती, सुंदर असं कोकण अशा सर्वांचा यामध्ये समावेश आहे.

यावेळी अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला की, देवा हे कॅरेक्टर अतरंगी आहे, कलरफुल आहे आणि आनंद वाटत फिरणारे आहे. रंगीत सदरा, फॅन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची मॉडर्न स्टाईल असा हा प्रत्येकाच्या मनातला देवा आहे. प्रत्येकाच्या मनात एक अतरंगी कॅरेक्टर असते. हा सिनेमा बघतांना प्रत्येकाला आपल्यामधला देवा नक्की सापडेल. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने बघावी अशी ही फिल्म आहे. यामध्ये  स्पृहा जोशी ही मीरा नावाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये मीरा ही देवा आणि माया मधला एक दुवा आहे.

चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अमितराज म्हणाले की, प्रत्येक गाणे सिनेमातील गोष्टींचा उलगडा करून देते. देवा या सिनेमामध्ये एकूण चार गाणी आहेत. त्यामधील एक गाणं गुरू ठाकूरने लिहिले असून तीन गाणी क्षितीज पटवर्धनने लिहीली आहेत. 'रोज रोज नव्याने' हे गाणं सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि गायिका श्रेया ह्यांनी गायले आहे. हे एक रोमँटिक गाणे आहे. 'जराशी जराशी' या गाण्याला हर्षवर्धन वावरे याचा गोड आवाज लाभला असून हे गाणे आयुष्याला नवी दिशा देणारे आणि जगण्याला नवसंजीवनी देणारे आहे. सिनेमातील सर्व गाणी प्रेक्षकांना सुमधुर संगीताची सफरदेखील घडवून आणणारीआहेत.

अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित आणि स्पृहा जोशी यांना या सिनेमामध्ये मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार, रिमा लागू या तगड्या कलाकारांची साथ मिळाली आहे आहे. हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.