अभिनेता सुमित राघवन (Sumit Raghavan) गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. मराठी सिनेमे आणि हिंदी मालिका त्याने गाजवल्या आहेत. पण तुम्हाला माहितीये का सुमित राघवनची एक बहीणही आहे जी अभिनेत्री आहे. नुकताच तिने मुलाखतीत याबाबतीत खुलासा केला. कोण आहे ती?
अभिनेता राम कपूरची पत्नी मराठी अभिनेत्री गौतमी गाडगीळ (Gautami Gadgil Kapoor) सर्व मराठी प्रेक्षकांच्या परिचयाची आहे. तिचा 'बिंधास्त' सिनेमा कायम स्मरणात राहणारा आहे. तसंच तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सुमित राघवनमुळेच खरं तर तिची अभिनयात एन्ट्री झाली. 'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी कपूर म्हणाली, "मी अगदीच योगायोगाने अभिनय क्षेत्रात आले. अभिनेता सुमित राघवन जो माझा भाऊ आहे. त्याला पोर्टफोलिओ बनवायचा होता म्हणून मी त्याच्यासोबत गेले होते. तर तिथे गौतमजींनी मला पाहून विचारलं की तू सुद्धा तुझे फोटो का काढत नाही? मी तेव्हा तेलकट केस आणि दोन पोनी अशा अवतारात होते. मी सरप्राईज होऊन विचारलं, मी फोटोशूट करु? माझ्या आईचीही तशीच प्रतिक्रिया होती."
"तेव्हा मी मेडिकलचं शिक्षण घेत होते. पोर्टफोलिओसाठी १० हजार रुपये लागणार होते. माझ्या आईने सांगितलं की आमच्याकडे फोटोशूटसाठी १० हजार नाहीत. त्याजागी आम्ही तिला पुस्तकं आणून देऊ. माझ्या वडिलांनीही नकार दिला. माझे वडील, भाऊ, वहिनी सगळे डॉक्टर आहेत. आई शाळेत मुख्याध्यापिका होती. मी स्वत: पॅथॉलॉजिस्ट आहे. त्यामुळे अभ्यासाशिवाय आम्ही कोणीच काही केलं नव्हतं. फोटोशूट करुन मॉडेलिंग करणं दूरच होतं. पण मी २००० साली आई वडिलांना सांगितलं की मला वेगळं राहायचं आहे. घरात खूप तमाशा झाला. पण शेवटी त्यांनी माझं ऐकलं आणि मी एकटी राहायला सुरुवात केली. मी पैसे कमवत होते. मला अभिनय करायचाच आहे असंही मी नंतर त्यांना समजावलं. वडीलांनी होकार दिला पण माझ्या आईने शेवटपर्यंत या गोष्टीला नकारच दिला होता."
मुलाखतीत गौतमीने सुमित नक्की कोणता भाऊ आहे हे स्पष्ट केलेलं नाही. गौतमीने त्याच्या 'हॅम्लेट' या नाटकाच्या प्रयोगालाही हजेरी लावली होती. हा त्याचवेळचा फोटो आहे. २००३ साली गौतमी राम कपूरसोबत लग्नबंधनात अडकली आणि स्क्रीनपासून दूर गेली. तिला सिया आणि अक्स ही मुलं आहेत.