गौरी नलावडे दिसणार वेबसीरीजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 11:21 IST
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत वेबसीरीजची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ एक वेबसीरीज येत असल्याचे दिसत आहेत. ...
गौरी नलावडे दिसणार वेबसीरीजमध्ये
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत वेबसीरीजची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ एक वेबसीरीज येत असल्याचे दिसत आहेत. एवढेच नाही, तर या वेबसीरीजमध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार अभिनय करताना पाहायला मिळत आहेत. आता हेच पाहा ना, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, पर्ण पेठे या सर्व कलाकारांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री गौरी नलावडेदेखील वेबसीरीजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरीजमध्ये तिच्यासोबत कोण असणार आहे हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर वेबसीरीजचे नावदेखील कळाले नाही. मात्र गौरी नलावडे ही वेबसीरीजमध्ये पहिल्यांदा झळकणार आहे. गौरी यापूर्वी स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. तसेच या मालिकेतील तिची वैदहीची भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यानंतर ती थेट कान्हा या चित्रपटात पाहायला मिळाली. अवधूत गुप्तेचा हा चित्रपट होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता वैभव तत्ववादी आणि गश्मिर महाजनी दिसले होते. त्यामुळे साहजिकच मालिकेनंतर तिला लॉटरीच लागली असे म्हणण्यास हरकत नाही. मालिका, चित्रपटानंतर आता ती नाटकाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक रंगभूमीवर सादर करताना पाहायला मिळत आहे. अॅब्स्युलेट असे या नाटकाचे नाव आहे. ती पहिल्यांदा या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर अभिनय करताना दिसत आहेत. आता, मालिका, चित्रपट, नाटकनंतर ती थेट वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. चला तर मग, गौरी नलावडेच्या या आगामी वेबसीरीजची थोडी वाट पाहूयात.