Join us

'फत्तेशिकस्त'च्या कलाकारांची किल्ले मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 07:15 IST

आगामी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या कलाकारांनी किल्ले बांधणीची मोहिम हाती घेत जुन्या प्रथेला उजाळा दिला आहे.

दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य, आणि आनंदाचा सण. या दिवाळ सणासोबत अनेक जुन्या रूढी, परंपराही जोडल्या  गेल्या आहेत. दिवाळीच्या सणादरम्यान किल्ले बांधण्याची जुनी प्रथा आहे. लहानांसोबत मोठेही त्यात आंनदाने सहभागी झाल्याचे पहायला मिळते. या प्रथेचा धागा पकडून आगामी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या कलाकारांनी किल्ले बांधणीची मोहिम हाती घेत जुन्या प्रथेला उजाळा दिला.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेता आस्ताद काळे, अजय पुरकर, हरिश दुधाडे, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, अक्षय वाघमारे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, तृप्ती तोरडमल, रुची सावर्ण, नक्षत्रा मेढेकर या कलाकारांनी किल्ले बांधणी केली. उत्सवांच्या व्याख्या सध्या बदलत चालल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर किल्ले बनवणे हा आनंदाचा ठेवा आहे. तो आवर्जून जपायला हवा यासाठीच आम्ही एकत्र येत या किल्ले बांधणीमध्ये आवर्जून सहभाग घेतल्याचे ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या कलाकारांनी यावेळी सांगितले.

पराक्रमाचे, शौर्याचे इतिहासाचे प्रतीक असलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीला समजावा व जतन व्हावा व त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने चित्रपट निर्मितीसोबत किल्लेबांधणीचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा करणाऱ्या ‘फत्तेशिकस्त’च्या टीमचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचेल हे नक्की !

ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ येत्या १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :फत्तेशिकस्तमृण्मयी देशपांडे