सैराट चित्रपटानिमित्त सोशलमीडियावर रंगलेली संकल्पना जळगावात प्रत्यक्षात अवतरली. आंतरजातीय विवाह करूनही कौटुंबिक सौख्य मिळविलेल्या जोडप्यांचा सत्कार सैराट चित्रपटाच्या मध्यंतरात करण्यात आला.
सैराट चित्रपटात जातिभेद तसेच हॉरर किलिंगचा प्रकार दर्शविण्यात आलाय. हा चित्रपट सुंदर असला तरी त्याचा शेवट मात्र कटू असल्याने प्रेक्षकांना तो खटकलाय. आंतरजातीय विवाह करूनही अनेक जोडपी सुखी समाधानाने त्यांचे कौटुंबिक आयुष्य जगताहेत, हेच दर्शविण्यासाठी जळगाव महापालिका व्हॉटस्अँप ग्रुपवर आंतरजातीय जोडप्यांचा सत्कार करण्याची संकल्पना मांडण्यात आली. ती दुपारच्या शो दरम्यान, प्रत्यक्षात अवतरली.एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनात नागरिकांना अशा प्रकारे सकारात्मक संदेश देण्याचा हा पहिलाच प्रयत्न व्हॉटस्अँप ग्रुपच्या माध्यमातून झाल्याने याची चांगलीच चर्चा झाली.