Join us

‘फास्टर फेणे’ पडद्यावर साकारणं माझं भाग्यच! - रितेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 19:07 IST

अबोली कुलकर्णी ‘बालक पालक’ आणि ‘यल्लो’ या मराठी चित्रपटांच्या निर्मितीनंतर अभिनेता रितेश देशमुख हे ‘फास्टर फेणे’ हा त्यांच्याच निर्मितीतील ...

अबोली कुलकर्णी ‘बालक पालक’ आणि ‘यल्लो’ या मराठी चित्रपटांच्या निर्मितीनंतर अभिनेता रितेश देशमुख हे ‘फास्टर फेणे’ हा त्यांच्याच निर्मितीतील चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या  भेटीला आले आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीविषयी आणि एकंदरितच ‘फास्टर फेणे’ या चित्रपटाच्या प्रवासाविषयी त्यांच्याशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा...* ‘बालक पालक’ आणि ‘यल्लो’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता ‘फास्टर फेणे’चे प्रोड्यूसर. काय आहेत भावना?- भा.रा.भागवत यांच्या लेखनीतून परिचित झालेली ‘फास्टर फेणे’ ही व्यक्तीरेखा मोठ्या पडद्यावर साकारणं ही माझ्यासाठी एक जबाबदारी होती. प्रेक्षकांपर्यंत ही व्यक्तिरेखा पोहोचवतांना मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. ‘बालक पालक’ आणि ‘यल्लो’ चित्रपटांबरोबरच ‘लयभारी’ देखील पे्रक्षकांनी डोक्यावर घेतला. त्यांच्याप्रमाणेच ‘फास्टर फे णे’ देखील प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करतो आहे. * ‘फास्टर फेणे’ चे स्टारकास्ट निवडण्यामागे काय भूमिका होती?-  उत्कृष्ट चित्रपटनिर्मिती करायची म्हटल्यास त्यातील प्रत्येक पात्राची योग्य रितीने निवड झाली पाहिजे, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे ‘फास्टर फेणे’ करत असताना भा.रा.भागवत यांनी लिहिलेल्या पात्रांप्रमाणे कलाकारांची निवड करणे हे माझ्यासाठी आव्हान होते. बनेश फेणे, भुभू, आप्पा, अबोली या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला अमेय वाघ, पर्ण पेठे, शुभम मोरे यासारख्या अनेक कलाकारांची निवड करता आली. या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या पाहिजेत, असा माझा उद्देश होता.  *  सध्या मराठी सिनेमांचे बजेट वाढतांना दिसते आहे, याबद्दल काय वाटते?- सध्या मराठी इंडस्ट्रीत चित्रपटांच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. निर्माता, दिग्दर्शक हे नवीन थीमवर आधारित चित्रपट करू पाहत आहेत. प्रेक्षकांना जर हे नव्या थीमवरील चित्रपट आवडत असतील नक्कीच नवे प्रयोग करायला काहीच हरकत नाहीये. *  समीक्षण आणि बॉक्स आॅफिसवर जमवलेला गल्ला या दोन्ही गोष्टीत बऱ्याच वेळेला विरोधाभास पहायला मिळतो. तुम्हाला काय वाटतं, काय जास्त महत्त्वाचं असतं?-  मला असं वाटतं की, समीक्षण आणि बॉक्स आॅफिसवर जमवलेला गल्ला या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. चित्रपट प्रेक्षकांना आवडणं हे सर्वांत जास्त महत्त्वाचं असतं. कारण एखादा चित्रपट तयार करत असताना त्यामागे खूप मोठी टीम मेहनत घेत असते. *  चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी मिळणारा अ‍ॅवॉर्ड हे खरंच एखाद्या कलाकारासाठी योग्य मुल्यमापन असू शकते का? तुम्हाला काय वाटते?- चित्रपट पाहत असताना थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळया, दिलेली दाद हाच खरंतर एखाद्या कलाकारासाठी अ‍ॅवॉर्ड असतो. त्यासोबतच वर्षाखेरीज जे पुरस्कार जाहिर होतात तो देखील एक सन्मानच असतो. मात्र, कलाकारासाठी सर्वांत महत्त्वाचा असतो तो प्रेक्षक. तरीही, मला वाटतं की, कुठल्याही पुरस्काराच्या अभिलाषेशिवाय कलाकार अभिनय साकारत असतात. त्यांना केवळ प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप हवी असते.* तुम्ही दोन गोड मुलांचे बाबा आहात. या सगळया व्यापातून त्यांच्यासाठी वेळ कसा काढता?- (हसून) अर्थात वेळ काढावा लागतो. कारण तेच तर खरं माझं आयुष्य आहे. मला आवडतं त्यांच्यासोबत खेळायला, मस्ती करायला. त्यांच्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. *  तुमच्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगाल?- सध्या तरी माझे लक्ष ‘फास्टर फेणे’वरच आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे त्यांचे आभार.