Join us

Exclusive : ​शान आणि सुखविंदर सिंग गाणार राजा या मराठी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 16:50 IST

मराठी चित्रपटांमध्ये हिंदी गायकांनी गाणे हे आता काही नवीन राहिलेले नाही. आजच्या घडीचे आघाडीचे गायक सोनू निगम, शंकर महादेवन, ...

मराठी चित्रपटांमध्ये हिंदी गायकांनी गाणे हे आता काही नवीन राहिलेले नाही. आजच्या घडीचे आघाडीचे गायक सोनू निगम, शंकर महादेवन, श्रेया घोषाल यांनी मराठी चित्रपटांच्या गीतांना त्यांचा आवाज दिला आहे. एवढेच नव्हे तर मराठी मालिकांचे शीर्षकगीतदेखील हिंदी गायक गाताना दिसत आहेत. श्रेया घोषालने गायलेले खुलता कळी खुलेना हे गाणे तर मोनाली ठाकूरने गायलेले सखी या मालिकेचे शीर्षकगीत प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. आता आणखी दोन गायक मराठीत गाणार असून त्यांनी त्यांची गाणी नुकतीच रेकॉर्ड केली. निकम्मा किया इस दिल ने, कल हो ना हो, हे शोना, तेरे नैना यांसारख्या सुपरहिट गाण्याचा गायक शान आता राजा या मराठी चित्रपटातील काही गाणी गाणार आहे. शानने याआधीदेखील मराठी चित्रपटात गाणे गायले आहे. तसेच रेती या मराठी चित्रपटाला त्याने संगीत दिले होते. आता तो राजा या मराठी चित्रपटातील दोन गाणी गात आहे आणि ही गाणी नुकतीच रेकॉर्ड करण्यात आली.तसेच या चित्रपटात शानप्रमाणेच आणखी एक बॉलिवूडचा अभिनेता गाणार आहे. छम्मा छम्मा या गाण्यामुळे नावारूपाला आलेला गायक सुखविंदर या चित्रपटात गाणार असून या चित्रपटातील तीन गाणी त्याने गायली आहे. सुखविंदरने लॉर्ड ऑफ शिंगणापूर या मराठी चित्रपटात याआधी एक गाणे सादर केले होते.राजा या चित्रपटाची कथा ही शशिकांत देशपांडेंची असून दिग्दर्शनदेखील त्यांचेच आहे. या चित्रपटात अनेक नवोदित कलाकारांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची कथा एका पॉप सिंगरच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. काहीच दिवसात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.