Join us

मैत्रीची बंध घट्ट करणारा 'डोक्याला शॉट' या तारखेला रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 17:19 IST

एकमेकांना या गोष्टीत सांभाळून घेताना त्या सर्व मित्रांची होणारी तारेवरची कसरत आणि त्यातून घडणारे विनोद यांचे अगदी धमाल मजेदार चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

चार जिवलग मित्रांच्या आयुष्यात अशी काही घटना घडते आणि त्यातून सुरु होतो 'डोक्याला शॉट'. सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित या चार मित्रांच्या एका धमाल गोंधळाची गोष्ट असलेला 'डोक्याला शॉट' हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा चित्रपटाचे निर्माते ट्रेलर पाहिल्यानंतर तरी व्यक्त केली जाऊ शकते. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांनी नुकतीच लोकमतच्या ऑफिसला भेट दिली आणि दिलखुलास गप्पा मारल्या.

डोक्याला शॉट या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथादेखील अगदी हटके आहे. अभिजीत (सुव्रत जोशी) आणि सुब्बलक्ष्मी (प्राजक्ता माळी) हे या चित्रपटात मुख्य भुमिका बजावणार आहे. तर अभिजीत आणि सुब्बलक्ष्मी हे एकमेकांच्या प्रेमात असतात. त्यांचे लग्न ज्या दिवशी होणार असते त्याच्या आदल्या दिवशीच एक घटना घडते, आणि त्यातून संपूर्ण चित्रपटाला कलाटणी मिळते. अभिजीत आणि त्याचे मित्र यांची या घटनेतून जी काही तारांबळ उडते आणि त्यातून सावरताना जी धमाल होते ती म्हणजे 'डोक्याला शॉट'. एकमेकांना या गोष्टीत सांभाळून घेताना त्या सर्व मित्रांची होणारी तारेवरची कसरत आणि त्यातून घडणारे विनोद यांचे अगदी धमाल मजेदार चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित हे या चित्रपटाद्वारे त्यांचे अभिनय कौशल्य दाखवणार आहे. दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांनी ​सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान घडलेले किस्से शेअर केले. ​झाले असे, सुव्रत आणि प्राजक्ताला त्यांनी सांगितले की, या चित्रपटात त्यांना एक गाणं गावे लागणार आहे तेव्हा ती दोघे खूप आनंदात होती. पण, त्यांना पुढे सांगितले की गाणं तमिळ भाषेत गायचं आहे तेव्हा मात्र त्यांची पाचावर धारण बसली. कारण गाणं गाताना स्पष्ट उच्चार, हरकती, सूर, ताल, लय या  सर्वांचीच गरज असते. पण प्राजक्ताने बेसिक गाण्याचे शिक्षण घेतले असल्याने ती तशी आनंदित होती. पण सुव्रतची तर पहिल्यांदाच गाण्यांशी ओळख होणार होती. पण ह्या सर्वांचा विचार शिवकुमारजींनी आधीच केला होता. म्हणूनच गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या तीन महिने आधी त्यांनी प्राजक्ताला आणि सुव्रतला या गाण्याचे बोल आणि त्याचा मराठीत अर्थ असे वाचायला दिले. ते रोज वाचून आणि तीन महिने गाणं सतत एकूण त्यांनी गाणं तोंडपाठ केले. शिवाय सूर नीट यावे यासाठी त्यांनी रियाजही सुरु केला. हे सर्व केल्यानंतर त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केले ते पण फक्त एकाच दिवसात. हे तमिळ गाणं मराठी आणि तमिळ या दोन्ही भाषांमध्ये आहे.

'डोक्याला शॉट' या चित्रपटाची निर्मिती उत्तुंग ठाकूर यांनी केली आहे. गुरु ठाकूर आणि चेतन सैंदाणे यांनी या चित्रपटातील गाणी लिहली आहे. त्यांच्या शब्दांना अमितराज, श्रीकांत-अनिता यांनी संगीतबद्ध केले आहे. तर मिका सिंग, कैलास खेर या दिगज्ज गायकांनी त्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाला रोहन-विनायक यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर सुमन साहू यांनी या सिनेमाचे छायाचित्रण केले आहे. हा चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.