२००४ साली स्मिता तळवलकर निर्मित आणि संजय सुरकर दिग्दर्शित ‘सातच्या आत घरात ‘ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात सुहास जोशी, गिरीश ओक, मकरंद अनासपुरे, नीना कुळकर्णी, विभावरी देशपांडे, निशिकांत कामत, भारत गणेशपुरे, रिमा लागू, मृण्मयी लागू, मानव कौल, कार्तिका राणे यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. राखी सावंत हिने या चित्रपटात ‘हिल हिल पोरी हिला’ या रिमिक्स गाण्यावर नृत्य सादर केले होते. या चित्रपटात मधुराचे पात्र कार्तिका राणे हिने साकारले होते. कार्तिकाचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता मात्र त्याआगोदर तिने हिंदी मालिकेत आणि जाहिरात क्षेत्रात स्वतःची ओळख बनवली होती.
कार्तिका राणे हिचा जन्म १७ मार्च रोजी झाला होता. ती बॉम्बेच्या सोफिया कॉलेजमध्ये समाजशास्त्राची विद्यार्थिनी होती. कार्तिकाचे काका प्रतापसिंह राव राणे हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री होते, तर तिचा चुलत भाऊ विश्वजित राणे हे गोव्यातील प्रसिद्ध राजकारणी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राणे कुटुंबाची मुळं राजकारणाशी जोडलेली आहेत. कार्तिकाचे काका म्हणजेच प्रतापसिंह राव राणे यांना मराठी नाटकांची आवड आहे.
कार्तिका ‘कंगन’, ‘हम परदेसी हो गये’ , ‘कॅप्टन व्योम’, ‘द ग्रेट मराठा’, ‘तेरे मेरे सपने’, ‘गुबारे’, ‘दीदी का दुल्हा’, ‘न्याय’, ‘ख्वाब’, ‘एक से बढकर एक’ अशा मालिकांमधून, चित्रपटांमधून छोट्या आणि मोठ्या पडद्यावर झळकली. २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘हुल्ला’ चित्रपटानंतर कार्तिका अभिनय क्षेत्रापासून दुरावली. कार्तिका राणे कुठे आहे आणि काय करते याबद्दलही कोणालाच काही माहिती नाही.