मुख्य भूमिका नाही पण सहाय्यक भूमिकेतून काही कलाकार रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. सिंघम, सिंबा, शेरसिंग, गली गली चोर है अशा अनेक चित्रपटातून सहाय्यक तर कधी खलनायकाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे अशोक समर्थ. (Ashok Samarth) अशोक समर्थ यांनी मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. त्यांची पत्नीदेखील मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेता अशोक समर्थ हा मूळचा बारामतीचा आहे. बारामतीमध्ये त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले तर पुढील शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. पुण्यात शिक्षण घेत असताना रंगभूमीशी त्याचा परिचय झाला. अभिनयाची आवड पुढे त्याला मुंबईला घेऊन आली. माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर लक्ष्य या लोकप्रिय मालिकेतून एसीपी अभय कीर्तिकर ही दमदार भूमिका त्याला मिळाली. या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली. जवळपास ५ वर्षे चालणाऱ्या या मालिकेतून अभय कीर्तिकर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर त्याने आपली पावलं हिंदी सिनेइंडस्ट्रीकडे वळवली.
इंसान या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रोहित शेट्टी च्या सिंघम या चित्रपटातील शिवाच्या भूमिकेने अशोकला खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील त्याच्या वाट्याला आलेले डायलॉगदेखील तुफान हिट झाले. रावडी राठोड, सिंबा, गली गली चोर है, सत्या २, आर राजकुमार, शेरसिंग अशा दमदार चित्रपटातून त्याला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याशिवाय मराठीत बार्डो, बेधडक, दंडीत, बकाल, विट्टी दांडू चित्रपटात काम केले.
ट्रॅफिक जॅम चित्रपटादरम्यान झाली दोघांची ओळख
२०१३ साली ट्रॅफिक जॅम हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अशोक समर्थ आणि शीतल पाठक मुख्य भूमिकेत झळकले होते. इथूनच त्या दोघांची ओळख झाली होती. आपणही एक चित्रपट दिग्दर्शित करावा अशी या दोघांची इच्छा होती. जवळपास सात वर्षांनंतर वर्धमान पुंगलिया निर्मित ‘जननी’ या आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक समर्थ याने केले आहे. चित्रपटाचे शूटिंग बारामती येथे पार पडले आहे. हा चित्रपट आता जवळपास पूर्ण होत आहे, त्यामुळे लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.