Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलखुलास अमेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 18:04 IST

बेनझीर जमादार दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून कैवल्य म्हणजेच अमेय वाघ याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या ...

बेनझीर जमादार
 
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून कैवल्य म्हणजेच अमेय वाघ याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेनंतर तो आता घंटा या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं पुन्हा जिंकण्यास सज्ज झाला आहे. याच चित्रपटाविषयी अमेयने लोकमत सीएनएक्सशी साधलेला मनमोकळा संवाद. 
 
१. घंटा या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
- घंटा या चित्रपटात मी राज नावाची भूमिका साकारली  आहे. या चित्रपटात माझे फरसाण आणि चिवडयाचे दुकान असते. पण माझी मॉडेलिंग एजन्सी काढण्याचे स्वप्न असते. कारण यामुळे मला सुंदर मुलींच्या संपर्कात राहण्याची संधी मिळणार असते. असे हे राजचे माझे मजेशीर पात्र तुम्हाला घंटा चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 
 
२. घंटा हा शब्द चित्रपटात व्दिअर्थी म्हणून वापरला आहे का?
- शाळेत घंटा वाजते. नाटकाच्या प्रयोगाच्यावेळी देखील तिसरी घंटा वाजली की, नाटक सुरू होते. मला हेच कळत नाही की, घंटा या शब्दाकडे लोक अश्लील शब्द म्हणून का बघतात. असो, पण चित्रपटात आमच्या नशीबाची घंटा कशी वाजते या अर्थाने हा शब्द वापरण्यात आला आहे. 
 
३. वेब शो, मालिका, नाटक आणि चित्रपट हे सर्वांचे शेडयुल कसे सांभाळतोस?
- खरं माझ्यासाठी या सर्व गोष्टी सांभाळणे ताऱ्यावरची कसरत आहे. एक कलाकार म्हणून अशा वेगवेगळया भूमिका करणे मला आवश्यक आहे. तसेच एकाच भूमिकेत राहायला मला स्वत:लाही आवडत नाही. वेगवेगळ्या भूमिका करणं हे अवघड जरा असले तरी ते करताना खूप मजा येते. 
 
४. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनंतर तू महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांनी ही तुला अधिक पसंती दिली याबाबत काय सांगशील?
- मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की दिल दोस्ती दुनियादारीसारखी मालिका मला करायला मिळाली. याआधी अशी मालिका हिंदीत किंवा मराठीत कधीच झाली नव्हती. त्यामुळे दिल दोस्ती हा प्रोजेक्ट करणे तसे खूप रिस्की होते. ही मालिका लोकप्रिय होण्याचे श्रेय दिग्दर्शक आणि लेखकाचे आहे. लेखकाने कैवल्य हे पात्र अत्यंत उत्तमरित्या लिहीले होते तर दिग्दर्शकाने माझ्याकढून ते सुंदररित्या करून घेतले आहे. त्यामुळेच कैवल्य यामाझ्या व्यक्तीरेखेला लोकांनी भरभरुन पसंती दिली. 
 
५. तुझ्या एखाद्या फॅनसोबतचा किस्सा आमच्यासोबत शेअर कर? 
एकदा तर नाटकाचा प्रयोग चालू होता. अचानक प्रेक्षकांमधून एक लहान मुलीने जोरात कैवल्य म्हणून आवाज दिला आणि प्रयोग संपल्यानंतर या मुलीने येऊन मला घट्ट मिठी मारली. हा माझ्यासाठी खूपच छान आणि वेगळा अनुभव होता.