Join us

​धनश्री काडगावकर आणि संग्राम समेळ ब्रेव्ह हार्ट या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 16:42 IST

धनश्री काडगावकर सध्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती राणाच्या वहिनीची भूमिका साकारत आहे. ...

धनश्री काडगावकर सध्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती राणाच्या वहिनीची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. तर संग्राम समेळ पुढचे पाऊल या मालिकेत काम करत असून तो गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेचा भाग आहे. त्याची भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. आता ते दोघे लवकरच एका चित्रपटात एकत्र येणार असून ते नायक-नायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. संग्राम आणि धनश्रीने कोणत्याही चित्रपटात एकत्र झळकण्याची ही पहिलीच वेळ आहे.ब्रेव्ह हार्ट या चित्रपटात धनश्री काडगावकर आणि संग्राम समेळ मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटात दोघांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा एका व्यक्तिच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असून ती हृदयाला स्पर्श करणारी आहे. त्या व्यक्तिचा संघर्ष प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एका प्रतिष्ठित कंपनीत कामाला असणाऱ्या एक धनधाकट माणसाला अचानक एक आजार होतो आणि एक एक करून त्याचे अवयव निकामी होऊ लागतात आणि त्याला अपंगत्व येते. पण त्याही परिस्थितीत हार न मानता तो सगळ्या गोष्टींचा सामना करतो अशी या चित्रपटाची कथा आहे. या सगळ्यात त्याचे वडील आणि त्याची पत्नी त्याला खूप साथ देते. या व्यक्तिची भूमिका संग्रामने तर त्याच्या पत्नीची भूमिका धनश्रीने साकारली आहे. तर संग्रामच्या वडिलांच्या भूमिकेत प्रेक्षकांना अरुण नलावडेंना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील धनश्री आणि संग्राममधील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी त्यांना खात्री आहे.