Join us
Daily Top 2Weekly Top 5

EXCLUSIVE: 'देऊळ बंद २'मधून श्रद्धा, महिलाशक्ती आणि शेतकरी प्रश्नांवर भाष्य; प्रवीण-स्नेहल तरडेंची दिलखुलास मुलाखत

By मयुरी वाशिंबे | Updated: May 18, 2026 12:12 IST

'देऊळ बंद २' चित्रपटाच्या निमित्तानं प्रवीण आणि स्नेहल तरडेंनी लोकमत फिल्मीला दिलेल्या खास मुलाखतीत चित्रपटामागचा विचार, अध्यात्म, अंधश्रद्धा आणि शेतकरी महिलांच्या संघर्षावर मनमोकळेपणाने भाष्य केलं.

मयुरी वाशिंबे

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २ - आता परीक्षा देवाची' या चित्रपटातून श्रद्धा, अध्यात्म, शेतकरी प्रश्न आणि महिलाशक्ती यांचा संगम मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या मराठी चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने कलाकारांनी लोकमत फिल्मीशी दिलखुलास संवाद साधला.

पहिल्या भागात एक शास्त्रज्ञ देवाच्या अस्तित्वावर प्रश्न विचारतो, पण दुसऱ्या भागात तुम्ही एका 'शेतकरी महिलेला' देवाच्या समोर उभं केलं आहे. हा विचार नेमका कुठून आला?

प्रवीण तरडे :  खरं तर विज्ञानाचा पाया अध्यात्मावर आधारित आहे.  संयोगाभावे गुरुत्वात् पतनम् हे महर्षी कणाद रचित वैशेषिक सूत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक सूत्र आहे. म्हणजे एखादी वस्तू कशाच्या तरी आधारावर नसेल किंवा तिला आधार देणारा दुसरा घटक नसेल, तर ती गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे थेट जमिनीवर पडते. हे आपल्या अध्यातमात कितीतरी वर्षांपूर्वी आधीच सांगितलंय, जे आम्ही देऊळ बंद सिनेमात मांडलं आणि आता १० वर्षांनी आता शेतकरी हा खूप महत्त्वाचा विषय हाती घेतला. तिथे एक नास्तिक शास्त्रज्ञ होता, ज्याची परीक्षा देवाने घेतली आणि त्याला परिक्रमा घडवून आली. आता 'देऊळ बंद २'मध्ये एक शेतकरी महिला देवाची परीक्षा घेणार आहे.  विज्ञान विरुद्ध अध्यात्म या चौकटीत न अडकता समाजातील वेगवेगळे विषय मांडायचे आहेत. म्हणूनच या चित्रपटाचे एकूण ११ भाग काढण्याची घोषणा केली आहे. हे सर्व ११ भाग समाजाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर असतील. 

टीझर लाँचसाठी अक्कलकोट निवडण्यामागे काय विचार होता? 

प्रवीण तरडे : पहिल्यांदाच असं झालंय की कुठलंही फाईव्ह स्टार हॉटेल न घेता आम्ही टीझर लाँचसाठी अक्कलकोटचं मंदिरच निवडलं. कारण, शेतकरी आत्महत्येचा विषय आहे आणि मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेणे बरे नाही.

अक्कलकोटमधील टीझर लाँचचा अनुभव कसा होता? 

स्नेहल तरडे :  मी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेले होते. स्वामींवर माझी खूप श्रद्धा आहे आणि माझ्या मध्यवर्ती भूमिकेच्या चित्रपटाचा टीझर तिथे लॉन्च होत होता. माझं काम स्वामींपर्यंत पोहोचतंय, ही भावना मनाला खूप भारावून टाकणारी होती. 

टीझरमध्ये "मनापासून बोलवलं की देव येतो" असं म्हटलं आहे. खऱ्या आयुष्यात श्रद्धेशी संबंधित असा काही अनुभव तुम्हाला आला आहे का?

प्रवीण तरडे : हो, असे खूप अनुभव आले आहेत. मी अनेक वर्ष लेखन, दिग्दर्शन, पथनाट्य करत कष्ट घेत होतो. रस्त्यावर पथनाट्य केली, अनेक कंपन्यांसाठी काम केलं. एका कंपनीच्या पथनाट्यासाठी सलग ५३ दिवस ट्रकमधून संपूर्ण भारतभर फिरलो होतो. मेहनत तेव्हाही खूप करत होतो, नाटकांना बक्षिसंही मिळत होती. पण, खरं मोठं यश मला देऊळ बंद सिनेमानंतर मिळालं. ज्या दिवसापासून मी स्वामींचं काम करायला लागलो, तेव्हापासून आयुष्यात जमीन-आस्मानाचा फरक जाणवला. कुणीतरी खरंच आपल्या पाठीशी आहे, अशी भावना मनात निर्माण झाली. श्रद्धेने, मनापासून काहीतरी करणं यापेक्षा शुद्ध गोष्ट दुसरी नाही. कोणताही स्वार्थ न ठेवता परमेश्वराचं नामस्मरण करत राहावं, असं मला वाटतं.

स्वतः आस्तिक असूनही नास्तिक शेतकरी महिलेची भूमिका साकारताना भावनिक तयारी कशी केली?

स्नेहल तरडे :  चित्रपटात मी नास्तिक शेतकरी महिलेची भूमिका साकारली. ज्यांच्यावर माझी एवढी श्रद्धा आहे,  त्यांना मी चित्रपटभर नुसती बोलतेय, नाव ठेवतेय, याचा मला खूप त्रास झाला. त्यामुळे रोज शूटिंग संपल्यानंतर मी मोहन जोशी सरांना स्वामी समजून त्यांच्या पाया पडायचे आणि 'स्वामी, मला माफ करा… कामासाठी मला हे बोलावं लागतंय' असं म्हणायचे.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषेबद्दल तुम्ही काय सांगाल?

प्रवीण तरडे: श्रद्धा म्हणजे काय? तर पांडुरंगाची वारी ९०० वर्षांपासून सुरू आहे. लाखो लोक अक्कलकोटला जातात. 'भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचं वाक्य लोकांना आधार देतं, ही श्रद्धा आहे. अंधश्रद्धेपासून दूर राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आमच्या सिनेमातही स्वामींच्या तोंडी स्पष्ट संवाद आहे की "जादूटोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाथा घालीन". आम्ही कुठेही चमत्कार किंवा भोंदूगिरीचं समर्थन केलेलं नाही. स्वामींच्या शिकवणीची तुलना अशा भोंदू बाबांशी होऊच शकत नाही.

मुख्य भूमिकेत काम करताना दडपण आलं होतं का?

स्नेहल तरडे : हो, खूप जाणवलं. याआधी मी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या होत्या. पण एखादी छोटी भूमिका करणं आणि संपूर्ण चित्रपटात महत्त्वाची किंवा मध्यवर्ती भूमिका साकारणं यामध्ये खूप मोठा फरक असतो, हे मला या अनुभवातून प्रकर्षाने जाणवलं. एखादा संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलणं हे अजिबात सोपं नसतं. त्यामुळे आज जे मुख्य भूमिका साकारणारे नायक-नायिका आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर निर्माण झाला आहे. कारण त्यांना फक्त स्वतःचं काम चांगलं करण्याचंच दडपण तर असतंच, शिवाय संपूर्ण चित्रपटाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर असते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पडद्यावर आपण दिसणार आहोत, प्रेक्षक आपल्याकडे पाहणार आहेत आणि आपल्या अभिनयावर कुणाचे तरी कोट्यवधी रुपये गुंतलेले आहेत, ही जाणीव खूप मोठी असते. 

'जवळच्या लोकांनाच संधी देता' अशी टीका तुमच्यावर होते, त्याकडे तुम्ही कसं पाहता?

प्रवीण तरडे :  अनेक जण म्हणतात हा जवळच्या लोकांना घेऊन सिनेमे करतो. माझ्याकडे स्वतःची विश्वासाची माणसं असताना मी त्यांना का दूर करावं. मी माझ्या घरात सिनेमा करतो. पण, माझ्या सिनेमाचा विषय वैश्विक असतो. या चित्रपटात स्नेहल मुख्य भूमिकेत आहेत, हिच्याकडून मी ४८ आणि ५०  डिग्री तापमान काम करुन घेतलं, हे मी दुसऱ्या अभिनेत्रीकडून करुन घेऊ शकलो नसतो. एकांकिका स्पर्धेत काम करणारे तरुण कलाकार या सिनेमात आहेत. तसंच एक रिक्षा ड्रायव्हर आणि महानगरपालिकेतील आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका व्यक्तीनं या सिनेमात काम केलंय. चित्रपटातील त्यांचा अभिनय पाहून मोहन जोशींनीही त्यांचं कौतुक केलं.  म्हणून मी म्हणतो माझ्या सिनेमात हिरो नसतो, माझा सिनेमा हिरो असतो. दोन वर्षाला एकच सिनेमा करतो. देवाच्या कृपेनं मी अजून फ्लॉप सिनेमा दिला नाही आणि मी शक्यतो देणार नाही. बाकी उरलेल्या काळात मी शेती करतो. मी मूळ शेतकरी आहे.  

'देऊळ बंद २'मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का?

प्रवीण तरडे : जगात आपण सर्वांचे आभार मानतो. पण, घरातल्या बायकोचे आभार मानायला आपण विसरतो. बायकोचं कौतुक जाहिरपणे आपल्याकडे केलंच जातं नाही, तिला गृहित धरलं जातं. म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून मी जाहीर आभार मानतोय. तू आहे म्हणून मी उभा आहे. मराठीत सिनेमा लिहिताना अनेकदा स्त्रीचा चेहराच लीड म्हणून डोळ्यासमोर येत नाही. बाईने ड्राईव्ह केलेला सिनेमा सुपरहिट होऊ शकतो, ही परंपरा आपल्या इथे फारशी नाही. पण हा सिनेमा ती परंपरा मोडणार आहे.

प्रेक्षकांनी 'देऊळ बंद २' का पाहावा? आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक कोणता विचार मनात घेऊन थिएटरबाहेर पडतील?

प्रवीण तरडे : प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणूनच जावं चित्रपट पाहायला आणि मग चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी ठरवावं आपलं मनोरंजन झालंय का प्रबोधन झालंय?  प्रबोधन करणारा हा मनोरंजनात्मक सिनेमा आहे. सिनेमा पाहताना दर १५ मिनिटांनी तुम्ही जे ठरवलेलं असेल त्याच्यापेक्षा वेगळंच घडणार.  हा सिनेमा आमच्या कुणासाठीही बघू नका. हा सिनेमा फक्त मोहन जोशी नावाच्या माणसासाठी पाहा. मी ठामपणे सांगतो हा चित्रपट पाहिल्यानंतर यंदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होणार. स्वतः परमेश्वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी परीक्षेला बसलाय आणि परीक्षा घेते आहे एक शेतकरी स्त्री. या जगात देवालाही परीक्षेस बसवण्याचा अधिकार फक्त शेतकरी आणि स्त्रीलाच आहे; आणि इथे तर एक 'शेतकरी स्त्री' आहे. अनंत कोटी ब्रह्मांडनायकाला एक बाई ड्राईव्ह करतेय. आत्महत्या केलेली शेतकरी बाई दाखवा. पुरुष आत्महत्या करुन पळतो. पण, घरातील बाई म्हणते मी आत्महत्या केली तर माझ्या लेकाराचं काय होईल. जो नवरा मेलाय, त्याची आई सांभाळायची असते, गोठ्यातील जनावर साभांळायची असतात. ती ताकद फक्त बाईत असते. हा चित्रपट महिलांवर झालेला आजवरचा सुंदर सिनेमा आहे. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Deool Band 2' focuses on faith, women's power, farmer issues.

Web Summary : Pravin Tarde's 'Deool Band 2' explores faith, spirituality, farmer issues, and women's empowerment. Snehal Tarde plays a key role as a skeptical farmer. Pravin plans 11 parts, each tackling social issues. The film questions faith, challenging viewers to consider its message.
टॅग्स :प्रवीण तरडेमराठी अभिनेतामोहन जोशी